चारच्या सुमारास सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी भवनात आगमन झाले. त्या आल्या तेव्हापासूनच त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची झुंबड उडालेली. यावेळी कार्यक्रमाची रचना बदलून टाकण्यात आली होती. राष्ट्रवादी भवनातील स्टेजचा वापर न करता सभागृहातच सुप्रिया सुळे यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यासोबत आ. विक्रम काळे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष विजय साळवे,कदीर मौलाना हे होते.
निवेदक मास्क लावा,सोशल डिस्टन्सिंग पाळा असे वारंवार सांगत होता. परंतु, कुणीही सोशल डिस्टन्सिंग न पाळता सुप्रिया सुळे यांच्या अवतीभवती गर्दी केली. अनेकांनी आणलेले बुके दिले. आणलेली निवेदने दिली. अनेकांनी फोटो काढून घेतले. हा सिलसिला एक तासभर सुरू होता. त्या आ.सतीश चव्हाण यांच्या सत्कारासाठी जायला निघाल्या,तेव्हाच ही गर्दी पांगली.
राष्ट्रवादी भवनात प्रवेश करतानाच माध्यमाच्या काही प्रतिनिधींनी सुळे यांना गाठले. सर्वांशी विचारविमर्श करुनच संभाजीनगरचा निर्णय घेतला पाहिजे,असे त्यायासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.