कोरोना काळापूर्वी बँकेत ग्राहकांना बसण्यासाठी व्यवस्था असे. पण, आता मागील वर्षीपासून बँकेबाहेरच ताटकळत रांगेत उभे केले जात आहे. बँकेत येणाऱ्या ग्राहकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे प्रत्येक बँक व्यवस्थापनाचे पहिले कर्तव्य आहे. मात्र, याच गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सिडकोतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या औद्योगिक शाखेबाहेर पेन्शनसाठी आलेल्या ज्येष्ठांना खात्यातून पैसे काढण्यासाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. बँकेत होणारी गर्दी टाळली जात आहे. पण तासंतास बाहेर बसून आलेल्या नागरिकांना येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसून आली नाही. अनेक जण आपल्या सोबतच पाण्याची बाटली घेऊन आल्याचे पाहण्यास मिळाले.
उल्कानगरीतील पंजाब नॅशनल बँकेत गेल्यावर सॅनिटायझरची बाटली ठेवली होती. पण येथेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे जार, पाण्याचे कुलर आढळले नाही. उस्मानपुरा एकनाथ रंगमंदिरसमोरील आयडीबीआय बँकेच्या शाखेबाहेर ग्राहक रांगेत उभे होते. पण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने समोरील दुकानातून पाण्याची बाटली विकत आणून तहान भागवताना ग्राहक दिसले. रोशनगेट परिसरातील महाराष्ट्र बँकेबाहेर रस्त्यावरच ग्राहक ताटकळत उभे होते. पिण्याच्या पाण्याचे सोडाच पण तिथेही बसण्यासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. सिडको बजरंग चौकातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतही हीच परिस्थिती होती.
चौकट
कर्मचारी घरून आणतात बाटल्या
अनेक बँकांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जारची व्यवस्था करण्यात आली आहे. पण कधी जार येतो, कधी नाही. यामुळे डब्यासोबत स्वत:च घरून पाण्याची बाटली भरून आणणे सुरू केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. जिथे कर्मचाऱ्यांसाठी पाणी नाही तिथे ग्राहकांचा पाण्याचा प्रश्न तर व्यवस्थापनाच्या ध्यानीमनी येणे कठीण.
कॅप्शन
एसबीआयच्या सिडको शाखेबाहेर ग्राहकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. अर्धा एकतास बसून तहानलेल्या ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथे दिसून आली नाही.