औरंगाबाद : शिवसेनेच्या मंत्र्याने उद्योग खात्यामार्फत जरी कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी काम केले असले तरी कौतुक किती करायचे. आता तुझे-माझे असा मुद्दाच नाही. आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत. कोरोना विषाणू जातपात, धर्म आणि पक्ष बघत नाही. ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, लढाईमध्ये गट आणि तटबाजी चालत नाही. अशा वेळेला एकत्रितपणे लढणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.
एमआयडीसीमार्फत उभारण्यात आलेले चिकलठाण्यातील सिपेट कंपनीतील कोविड हॉस्पिटल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतून आॅनलाईन कळ दाबून केले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची ऑनलाईन उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, राज्यममंत्री अब्दुल सत्तार, खा. भागवत कराड, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, एमआयडीसीचे सीईओ डॉ. अन्बलगन, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे. संकट आल्यावर डोळे उघडतात. कोरोनाने डोळे उघडले असून, कसे जगावे हे शिकविले आहे. राज्यात एकही जिल्हा आरोग्यसेवेविना राहू नये, अशी इच्छा आहे. उद्योग खात्याने महिनारात कोविड हॉस्पिटल उभारले, त्याचे कौतुक कुणी करणार नाही. आपणच आपले कौतुक केले पाहिजे. मार्च २०२० पासून आजपर्यंत राज्यात सरासरी दररोज एक विषाणू प्रयोगशाळेची उभारणी होत आहे. राज्यात शंभराहून अधिक विषाणू तपासणी प्रयोगशाळा लवकरच होतील. प्रसंगी आरोग्यमंत्री टोपे, राज्यमंत्री देशमुख यांनी आॅनलाईन मार्गदर्शन केले, तसेच पालकमंत्री देसाई, राज्यमंत्री तटकरे यांनी एमआयडीसी यंत्रणेचे कौतुक केले.
हॉस्पिटलमध्ये येण्याची वेळ येऊ देऊ नका सर्व प्रशासकीय यंत्रणा जिवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. ही लढाई सोपी नाही; परंतु असे असले तरी हॉस्पिटलपर्यंत येण्याची वेळ कुणावर येऊ नये, यासाठी जनजागृती करावी. ७ वर्षांपासून ९० वर्षांपर्यंतचे रुग्ण बरे झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
२५६ खाटांचे कोविड हॉस्पिटल एमआयडीसीने उभारलेल्या २५६ खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये १२८ खाटांना आॅक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. याबरोबरच आयसीयू, एक्स-रे आदी आवश्यक सुविधाही याठिकाणी आहेत. या रुग्णालयासाठी लागणारे ११५ मनुष्यबळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यापीठात विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्र कायमस्वरूपी सुरू करण्यात आले आहे. डीएमआयसीतील ‘आॅरिक सिटी’च्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रयोगशाळा उभारली आहे. संसर्गजन्य रुग्णालय, विषाणू तपासणी प्रयोगशाळेची देखभाल प्रशासनामार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.