भूम : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची जनावरे जगविण्यासाठी यापुढे चारा छावण्यांची नितांत आवश्यकता आहे़ हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत एकही चारा छावणी बंद पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले़भूम शहरानजीकच्या वडमाऊली महिला दूध संस्थेच्या चारा छावणीला बागडे यांनी शनिवारी भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला़ यावेळी ते बोलत होते़ बागडे म्हणाले, मी एक शेतकरी असल्याने दुष्काळात शेतकऱ्यांना पशुधन जगविताना किती अडचणी येतात याची माहिती आहे़ चाऱ्याअभावी पशुधनाची विक्री होवू नये, यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ भूम तालुक्यात सर्वाधिक चारा छावण्या असून, जवळपास ४३ हजार पशुधनाला चारा मिळत आहे, ही समाधानकारक बाब आहे़ जनावरांना चारा देताना विशेष काळजी घ्यावी, चारा वाया जाणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे़ मध्यंतरी चारा छावण्या बंद होणार असल्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आले होते़ मात्र, हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे़ येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी छावण्यांची आवश्यकता आहे़ त्यामुळे छावण्या बंद होणार नाहीत, असेही बागडे यांनी सांगितले़ कार्यक्रमास भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड़ मिलिंद पाटील, बाळासाहेब क्षीरसागर, आ़ राहूल मोटे, माजी जिप अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अंगद मुरूमकर, सेना तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, जिल्हा उपप्रमुख दिलीप शाळू, आऱडी़सूळ, काकासाहेब चव्हाण, हनुमंत पाडुळे, सोपान वरवडे, शेतकरी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते़
एकही चारा छावणी बंद पडणार नाही
By admin | Published: February 22, 2016 12:23 AM