दोस्त दोस्त ना रहा : वैजापूर न.प. निवडणुकीचा आखाडा तापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:30 AM2018-03-21T00:30:45+5:302018-03-21T11:11:17+5:30
येथील न.प. निवडणुकीचा आखाडा तापला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने आपापल्या जोरावर निवडणूक लढविण्याची म्हणजेच स्वत:च्या झेंड्यांखाली विरोधकांची उणीदुणी काढण्याची घोषणा केली. त्यामुळे कालपर्यंत गळ्यात गळे, मांडीला मांडी आणि खांद्याला खांदा लावणारे नेते आज एकमेकांवरच शब्दांच्या पिचकाऱ्या उडवून शिमगा खेळताना दिसणार आहेत. म्हणजे यांचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण याचा संशयकल्लोळ वैजापूरच्या राजकारणात चालू आहे.
मोबीन खान
वैजापूर : येथील न.प. निवडणुकीचा आखाडा तापला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपने आपापल्या जोरावर निवडणूक लढविण्याची म्हणजेच स्वत:च्या झेंड्यांखाली विरोधकांची उणीदुणी काढण्याची घोषणा केली. त्यामुळे कालपर्यंत गळ्यात गळे, मांडीला मांडी आणि खांद्याला खांदा लावणारे नेते आज एकमेकांवरच शब्दांच्या पिचकाऱ्या उडवून शिमगा खेळताना दिसणार आहेत. म्हणजे यांचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण याचा संशयकल्लोळ वैजापूरच्या राजकारणात चालू आहे.
निवडणूक बदलली की राजकीय समीकरणात बदल होतात. युत्या-आघाड्या तसेच मित्र-शत्रू बदलतात. या राजकीय गणितांचा पुनश्च अनुभव देणाºया वैजापूर नगर परिषद निवडणुकीने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून राजकारणातील सर्व डावपेच कृतीत आणताना बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे. मात्र, जनाधार नेमका कोणाला साथ देईल, याचा अंदाज कठीण बनल्याचेच चित्र शहरात दिसून येत आहे. नगर परिषद निवडणूक रिंगणात नेमके किती अन् कोणते उमेदवार असणार हे येत्या २६ मार्चला स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीचा विचार करता प्रामुख्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एम.आय.एम.चे उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारांचीही मोठी संख्या असल्याने येथील निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकेकाळचे मित्र असलेल्या, मात्र आता पालिका निवडणुकीत राजकीय विरोधक असलेल्या आपल्याच मित्रांना पराभूत करण्याची वेळ माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यावर आली असून यामध्ये नेमके कोण यशस्वी होतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून शिल्पा परदेशी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. शिल्पा परदेशी या माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पत्नी असल्याने ही निवडणूक परदेशींसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची सून सय्यद तशफा अझहर अली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी व एम.आय.एम.ने काही प्रभागात आपले उमेदवार उभे केले असून नगराध्यक्षपदासाठी डॉ. राजीव डोंगरे यांच्या पत्नी विजया डोंगरे यांचे ऐन वेळेवर भाजपकडून तिकीट कापले गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज सादर केल्याने त्या ऐन वेळेवर काँग्रेससोबत जाणार की अपक्ष तिकीटावरच निवडणूक लढविवार यावर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जनतेतून नगराध्यक्षासह अकरा प्रभागातून २३ नगरसेवक निवडले जाणार असताना नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली आहे. काही आजी माजी नगरसेवकांसह शहरातील चर्चेतील पदाधिकाºयांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असून बहुतेक जण मतदारांशी संपर्क साधून असल्याने सर्व लढती चुरशीने होण्याचीच चिन्हे दिसून येत आहेत.
नव्या समीकरणांची जुळवणी होणार
शहरात शिवसेनेला आपली परिस्थिती भक्कम असल्याचे भाजपला दाखवायचे आहे. राष्ट्रवादीला देखील आपण शहरात दुसºया क्रमांकाचा पक्ष असल्याने आपले महत्त्व सिद्ध करायचे आहे. मात्र २६ मार्चनंतर राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व शिवसेना यांच्यात समझोता होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. थेट नगराध्यक्षपदाची ही निवडणूक अधिक चुरशीची होणार यात शंकाच नाही. मात्र त्यानिमित्ताने नव्या समीकरणांची जुळवणी होणार आहे.
शहरात एकूण मतदारसंख्या ३८ हजार ९८९ असून त्यात सर्वाधिक मतदार संख्या मुस्लीम समाजाची १० हजार ७०४ आहे. त्यानंतर अनुसूचित जातीची मतदार संख्या ६ हजार २७९ अणि अनु. जमातीची मतदारसंख्या १ हजार ३१ असून व इतर समाजाचे २० हजार ९७५ मतदार आहेत. शहरात रणकंदन होत असताना अत्यंत उदासिनतेने नागरिक याकडे पाहत आहेत. ठराविक मंडळीपुरताच हा मर्यादित खेळ ठरल्याचे स्पष्ट चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे.