अजिंठा (औरंगाबाद ) : बँकेकडून पोस्टाद्वारे आलेले शेतकऱ्याचे एटीएम कार्ड व चेक बुक मित्राने परस्पर सोडवून घेतले. यानंतर सलग ४ वर्षे ते वापरत त्यातून १ लाख ८० हजार रुपये परस्पर खात्यातून काढून घेतल्याची घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली. शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपी मित्राविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव कौतिक देवराव पांडे (रा. वडाळा) असे असून फसवणूक करणाऱ्या मित्राचे नाव शिवाजी भिका शेळके (रा. वडाळा) असे आहे.
कौतिक देवराव पांडे यांना आयसीआयसीआय बँकेने पोस्टाद्वारे एटीएम कार्ड व चेकबुक २०१४ मध्ये पाठविले होते. पांडे यांचा अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांचे मित्र शिवाजी भिका शेळके याने पोस्टातून सोडवून घेतले. १९ सप्टेंबर, १४ ते २१ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान त्या एटीएम कार्ड व चेकबुकद्वारे शिवाजीने सुमारे १ लाख ८० हजार रुपये परस्पर काढून घेतले.
शेती विकून भरले कर्जशेतकरी कौतिक देवराव पांडे यांनी सिल्लोड येथील आयसीआयसीआय बँकेतून २ वर्षांपूर्वी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व शेतीत उत्पन्न न झाल्याने या शेतकऱ्याने शेती विकून बँकेचे कर्ज भरले. त्यानंतर बँकेने पुन्हा त्यांना कर्ज दिले. कर्जाचे पैसे सेव्हिंग अकाउंटवर जमा केले. कर्ज मंजूर करण्यासाठी सदर आरोपी बँकेत त्यांच्यासोबत येत होता. त्यामुळे त्याला सर्व माहिती होती. त्याचा गैरफायदा त्याने घेतला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली.
बँक कर्मचाऱ्याला आला संशय सदर शेतकरी अशिक्षित आहे. कर्जाची रक्कम परस्पर खात्यातून निघत आहे. एटीएम शेतकऱ्याला वापरता येत नाही व पैसे गायब होत आहेत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यास घरी जाऊन विचारणा केली, तेव्हा मी पैसे काढलेच नाही. याची चौकशी करा अशी मागणी शेतकऱ्याने केली. बँक अधिकारी व शेतकऱ्यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सर्व एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व शेतकऱ्यास दाखविले. त्यावरून मित्रानेच घात केल्याचे समोर आले व पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले.
आरोपीला पोलीस कोठडी या प्रकरणी पांडे यांनी सायबर सेल विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर सेल विभागाचे पोलीस उपनिरिक्षक सय्यद मोहसीन अली अझर अली यांनी शुक्रवारी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी भिका शेकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर आरोपीला सिल्लोड न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, सपोनि. किरण आहेर, बीट जमादार अनंत जोशी, दीपक भंगाळे, समद शेख करीत आहेत.
आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घ्याकितीही जवळचा व्यक्ती असो त्यावर विश्वास ठेवू नका. काळजीपूर्वक एटीएम व चेकबुक हाताळा. आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या.- गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी