सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : कॉँग्रेस लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे, भाजप सत्तेत आली तर प्रधानमंत्री मोदी संविधान बदलतील. मात्र, कोणतेही सरकार आले अन् कोणीही प्रधानमंत्री झाले तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील मूलभूत तत्व बदलूच शकत नाही. फक्त 'पार्ट-बी' मध्ये दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी न पडता भाजपचे जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना निवडून द्या असे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सिल्लोड येथे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नीलम चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते. गडकरी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला, काँग्रेसने ८० वेळा चुकीच्या पद्धतीने संविधानाची मोडतोड केली. भाजप सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र काँग्रेस भाजपवर खोटे आरोप करत आहे. भाजप मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवतील असे म्हणत आहे. मात्र, त्यात तथ्य नाही देशाचा विकास करणे हाच प्रधानमंत्री मोदी यांचा ध्यास आहे. तरुणांना रोजगार देणे, शेतकरी अन्नदाता सोबत इंधनदाता, ऊर्जादाता कसा होईल यासाठी भाजप सरकार काम करत आहे. स्मार्ट शहर नव्हे तर खेडी सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे, असेही गडकरी म्हणाले.
यावेळी रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांची भाषणे झाली. मंचावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अब्दुल समीर, विजय औताडे, इद्रिस मुलतानी, सांडू पा. लोखंडे, भाजप नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे,अर्जुन पा गाढे, श्रीराम महाजन, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक गरुड, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष देविदास लोखंडे, मकरंद कोरडे, विनोद मंडलेचा आदींची उपस्थिती होती.