छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्यांमध्ये समलिंगी विवाहाचे फॅड आले आहे. अशा विवाहांना मान्यता द्यावी की अथवा नाही, यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा समलिंगी विवाहांना मान्यता म्हणजे समाजासाठी घातक ठरू शकते. समाजाचा समतोल बिघडू शकतो. यासाठी समाजातील सर्व घटकांचा विचार ऐकावा तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने घाईघाईत निर्णय घेऊ नये, अशी विनंती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केली.
विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी व बजरंग दलाचे प्रशिक्षण शिबिर देशभरात सुरू आहे. त्यानिमित्ताने परांडे यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, लग्नविधी हा भारतीय समाजातील सर्वच जाती-धर्मामध्ये पवित्र असा विधी आहे. यामुळे समलिंगी विवाहांना सर्व स्तरातून विरोध होत आहे. निर्णय घेण्यापूर्वी याचा विचार न्यायालयाने करणे आवश्यक आहे, असे विहिंपचे मत आहे. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले; पण काही राजकीय पक्ष या नावाला विरोध करीत आहेत. या विरोधात विहिंप आक्रमकपणे उभी राहील. दोन महिन्यांत देशात विविध भागांत दंगली घडल्या. त्या घडविणाऱ्यांना कठोर शासन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रपरिषदेस प्रांताध्यक्ष संजय बारगजे, आनंद पांडे यांची उपस्थिती होती.
धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रातही लागू करावाधर्मांतरविरोधी कायदा काही राज्यांत लागू झाला. केंद्र सरकारनेही यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्रातही राज्य शासनाने कायदा लवकर लागू करावा, अशी मागणी विहिंपतर्फे करण्यात आली.
मंगळवारी देशभरात सामूहिक हनुमान चालिसा पठणबजरंग दलावर बंदी आणण्यासाठी काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यास विरोध दर्शविण्यासाठी बजरंग दल, विहिंपतर्फे देशभरात मंगळवारी (९ मे) सायंकाळी सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात येणार असल्याची घोषणा परांडे यांनी केली.