औरंगाबाद : शेंद्रा- बिडकीन ‘डीएमआयसी’ या औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करण्यासाठी पाहणी करून गेलेल्या कंपन्या लवकरच येथे येतील, अशी अपेक्षा होती; परंतु मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत शासनासोबत झालेल्या सामंजस्य करारामध्ये १२ पैकी एकाही कंपनीने औरंगाबादेत गुंतवणुकीचा करार केलेला नाही. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या येथे येणार म्हणून केवळ घोषणाच ठरल्या की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
यासंदर्भात येथील उद्योग क्षेत्रातही नाराजीचा सूर उमटला आहे. ‘लॉकडाऊन’नंतर आता गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब निश्चित चांगली असली, तरी ‘डीएमआयसी’च्या पार्श्वभूमीवर मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत केलेल्या कराराच्या वेळी एक-दोन कंपन्यांचा विचार औरंगाबादसाठी करायला हरकत नव्हती, असे मत येथील उद्योजकांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबादेत रशिया येथील एनएलएमके, चीन येथील बाहे मेडिकल या कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. डेटॉल, हार्पिक उत्पादन असलेला रेकिट बेन्कीझर ग्रुप गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. किया मोटार्सने येथे पाहणी केली आहे. औषधनिर्माण, अन्नप्रक्रिया, संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी चर्चा सध्या सुरू आहे. तथापि, हे उद्योग येथे येण्यासाठी सध्यापेक्षा वेगळे काय करता येईल, याचाही अभ्यास करावा लागेल; अन्यथा, ‘डीएमआयसी’मध्ये तयार असलेली ३ हजार एकर जागा आणि भविष्यात येणारी ७ हजार एकर जागा विकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, अशा भावना उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत.
औरंगाबादचा विचार नक्कीच -सुभाष देसाई राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, पालकमंत्री या नात्याने आपण नेहमीच औरंगाबादला प्राधान्य दिले आहे. येथे आपण व्हायरॉलॉजी लॅब आणली. कोविड हॉस्पिटल उभारले. कालचे जे फक्त १२ सामंजस्य करार झालेत, असे असंख्य करार होणार आहेत. त्यात औरंगाबादचासुद्धा नंबर आहे. हे सर्व खासगी उद्योग आहेत. गुंतवणूदार हे स्थळ निवडत असतात. या पुढच्या काळात औरंगाबादेत जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
आपण कुठे कमी पडलो, याचा विचार व्हावा ‘सीआयआय’ या उद्योग संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले की, कालच्या सामंजस्य करारामध्ये औरंगाबादचा समावेश नाही. हे ‘डीएमआयसी’च्या दृष्टीने निराशाजनक असले, तरी आपण कुठे कमी पडलो आहोत, याचा विचार केला पाहिजे. औरंगाबाद हे आॅटोमोबाईल हब आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रेट वॉल ही चीनची आॅटोमोटिव्ह कंपनी औरंगाबादेत येण्यास हरकत नव्हती. दुसरीकडे, महाराष्ट्रात डेटा सेंटरच्या इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात येत आहेत. यासाठी आपण स्ट्राँग फायबर कनेक्शन जर घेऊन येऊ शकलो, तर आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबी येथे येऊ शकतात. या स्पर्धेत आपण कुठे कमी पडत आहोत, हे तपासून प्रयत्न करायला हवेत.