छत्रपती संभाजीनगर : 'ओळखलं नाही का, गाडी कोणाची आहे ?' इनोव्हा कारमधून तरुणाने असा प्रश्न विचारताच वाहतूक पोलिसांनी आमदार पुत्राच्या गाडीला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. एवढेच नाही तर पूर्वीच्या आठ हजारांच्या दंडासह एकूण नऊ हजार रुपये दंड वसूलदेखील केला. बुधवारी रात्री आठ वाजता कॅनॉट प्लेस परिसरात वाहतूक पोलिसांच्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.
उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त अशोक थोरात यांनी बुधवारी सायंकाळी कॅनाॅट प्लेसमधील टवाळखोर, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे आदेश दिले होते. आठच्या सुमारास एका फॅन्सी लाइट, लाल-निळे डिस्को लाइट असलेली इनोव्हा त्यांनी थांबवली. कारमधील तरुणाने काच खाली करून पोलिसांनाच प्रतिप्रश्न केला. ‘लायसेन्स नाही, काय करायचे ते करा,’ असे म्हणताच कर्मचाऱ्यांनी सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांना हा प्रकार सांगितला. मिरधे यांनादेखील मुलाने तसेच उत्तर दिले. ई-चालान मशिनमध्ये आमदार नारायण कुचे यांची ही कार असल्याचे निष्पन्न झाले. तरीही पोलिसांनी नियम मोडल्याप्रकरणी दंड ठोठावला.
त्यानंतर आमदारपुत्र निघून गेला. १५ मिनिटांनी पुन्हा एकाला सोबत घेऊन पोलिसांकडे गेला. पोलिसांनी त्यांना जागेवरचा एक हजार व पूर्वीचा महामार्गावरील आठ हजार असा नऊ हजार दंड भरण्यास सांगितला. अन्य वाहनचालक, माध्यम प्रतिनिधींना पाहून आमदारपुत्राने नऊ हजार रुपये दंड भरून निघून जाणेच उचित समजले.
या एकूण कारवाईत- ४०६ वाहनांची तपासणी- २१२ वाहनचालकांवर कारवाई- २ लाख ४० हजार दंड ठोठावला.- १ लाख २० हजार २५० रुपये जाग्यावर वसूल केला.