औरंगाबाद : जिल्हा वकील संघाचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होऊनही जुलै २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ न शकलेली नवीन कार्यकारिणीची निवडणूक २४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. यापूर्वी जुलै २०१९ ला वकील संघाची निवडणूक झाली होती.
विशेष म्हणजे या वेळी ‘मास्क नाही तर मतदान नाही’ (‘नो मास्क, नो व्होट’) असा निर्धार वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. विलास पाटणी, सचिव ॲड. तांदुळजे आणि संपूर्ण वकील संघाने व्यक्त केला असून मतदार वकिलांनी त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी सुमारे २००० मास्कधारक वकील सदस्य मतदान करणार आहेत.
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया १४ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार आजपर्यंत वैध मतदार यादी, उमेदवारांसंबंधी आक्षेप, सर्व पदांसाठी नामांकन पत्र स्वीकृती आणि पात्र उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे. उद्या मंगळवारी अधिकृत उमेदवारांची नावे घोषित केली जातील. बुधवारी उमेदवारांना नामांकन मागे घेण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर शुक्रवारी मतदान आणि मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे. शुक्रवारी वकील संघाचे एक अध्यक्ष, एक महिला आणि एक पुरुष असे दोन उपाध्यक्ष, एक सचिव, एक सहसचिव आणि ११ सदस्य पदासाठी मतदान होणार आहे.