लातूर : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याची केलेली तरतूद शिक्षण घेण्यासाठी सुलभ झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र विषयांचा ब्रीज कोर्स करावा लागणार आहे. ना गणित, भौतिकशास्त्र डावलले, उलट इंजिनिअरिंगचे शिक्षण सुलभ केले आहे, असे मत अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांना पाहिजे तो कोर्स निवडण्यासाठी संधी दिली पाहिजे. पूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य होते. आता रसायनशास्त्र ऐच्छिक विषय आहे. इलिजिबिलिटी वाढविण्यासाठी एयआयसीटीईने ही तरतूद केली आहे; परंतु प्रवेश झाल्यानंतर भौतिकशास्त्र आणि गणिताचा ब्रीज कोर्स विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तंत्रनिकेतनच्या मुलांना पदवी अभियांत्रिकीला प्रवेश दिल्यानंतर ब्रीज कोर्स करावा लागतो. त्याच धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीला भौतिकशास्त्र, गणित नाही, त्यांना ब्रीज कोर्स करावा लागेल. ही येऊ घातलेली पद्धत अभियांत्रिकी शिक्षण सुलभ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्यासाठी भौतिकशास्त्र, गणित हे विषय राहणार आहेत. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची पात्रता वाढविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने गणित, भौतिकशास्त्राऐवजी अन्य विषयांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे, जो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. इंजिनिअरिंगचा प्रवेश सुलभ करणारा आहे. कालानुरूप केलेला बदल फायद्याचाच असतो. पीसीएम ग्रुपने पात्रता भरत नसेल, तर अन्य १४ संबंधित विषयाचे गुण ग्राह्य धरले जातील. त्यामुळे हा निर्णय चांगला असल्याचे बिडवे अभियांत्रिकीचे प्रा. डाॅ. संजय मंत्री म्हणाले.
नव्या शैक्षणिक धोरणाची ही पहिली स्टेप आहे. कला, वाणिज्य, विज्ञान असे अकरावी, बारावीला पुढील काळात राहणार नाही. बारावीनंतरच विद्यार्थ्यांना विषय निवडता येणार आहेत. त्याअनुषंगाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. पीसीएम ग्रुपमध्ये ५० गुण भरत नसतील तर इलेक्ट्राॅनिक्स, काॅम्प्युटर अशा संबंधित विषयांचे गुण मोजले जातील आणि विद्यार्थी पात्र ठरेल. विद्यार्थ्यांची पात्रता वाढविणारा हा निर्णय आहे. - प्रा. श्रीकांत तांदळे, बिडवे अभियांत्रिकी काॅलेज.