औरंगाबाद : वयाचे काय घेऊन बसलात, या वयातही मी चंद्रकांत खैरे यांच्याबरोबर दौलताबाद किल्ला चढण्याची स्पर्धा लावायला तयार आहे, असे जाहीर आव्हान आ. हरिभाऊ बागडे यांनी दिले. काल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता वयोमानानुसार हरिभाऊ बागडे यांनी शांत बसावे, असा सल्ला दिला होता. यावर बागडे यांनी हे प्रत्युत्तर एका जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भातील एका पत्रकार परिषदेतून दिले.
यावेळी आ. हरिभाऊ बागडे म्हणाले की, प्रेरणा बँकेत एकाच दिवसात थेट सोळाशे सदस्य करण्याचा पराक्रम जगन्नाथ काळे यांनी नोंदविला आहे, हे कोणत्या सहकारात बसते, स्वतःच्या गावातील विकास सोसायटीत जालना जिल्ह्यातले पाहुणे कसे चालतात, असा निशाणा बागडे यांनी जगन्नाथ काळे यांच्यावर साधला. डॉ. कल्याण काळे यांच्या आरोपांचेही त्यांनी यावेळी खंडन केले. दूध संघाच्या ठेवी जिल्हा बँकेतून मोडल्या व त्या जनता बँकेत ठेवल्या, असा आक्षेप काळे यांनी घेतला होता. व्याजदर जास्त मिळत असल्याने या ठेवी जनता बँकेत ठेवल्या. राखीव निधी ठेवण्याचा सहकाराचा नियमच आहे, तो आम्ही पाळतो, असे आ. बागडे म्हणाले. यावेळी नितीन पाटील, अभिजीत देशमुख आदींची उपस्थिती होती.
खैरेंच्या सैनिकी शाळेतून किती अधिकारी झालेते पुढे म्हणाले की, देवगिरी बँक, साखर कारखाना व शिक्षण संस्था आम्ही स्वतः स्थापन केलेल्या आहेत व त्या वर्षानुवर्षे व्यवस्थितपणे चालवित आहोत. खैरे यांनी सैनिकी शाळा काढली. सरकारची तीस एकर जमीन त्यांना मिळाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणकोण आहेत व सैनिकी शाळेमधून किती कर्नल, किती जनरल, किती अधिकारी निर्माण झाले हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान हरिभाऊ बागडे यांनी दिले