छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडून कोण येणार याची प्रचंड उत्सुकता शहरात पाहण्यास मिळत आहे. निवडून महायुतीचा उमेदवार येवो की, महाविकास आघाडी किंवा एमआयएमचा उमेदवार यापैकी कोणीही निवडून आले, तरी शहरात अडीच टनपेक्षा अधिक गुलाल उधळणार हे मात्र नक्कीच. अहो, खास गुजरात राज्यातील छोटा उदयपूरहून गुलाल मागविण्यात आला आहे. यावेळी विविध रंगांची छटा असेल.
कोणतीही निवडणूक असो विजयी उमेदवाराची मिरवणूक काढली जाते. चौफेर गुलालाची उधळण केली जाते. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. जिल्ह्यात तिरंगी निवडणूक बघण्यास मिळाली. मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी दूरदृष्टीचा विचार करून २० ते २५ दिवस अगोदरच गुजरातमधून ५ टन गुलाल शहरात आणून ठेवला आहे.
अडीच टन गुलालाची विक्रीगुलालाचे व्यापारी युवराज साहूजी यांनी सांगितले की, शहरात ५ टन गुलाल आला असला, तरी मागील १० दिवसांत त्यातील अडीच टन गुलाल विक्री झाला आहे. त्यातही दीड टन हिरवा रंग, तर १ टन केशरी रंगाची (गुलालाची) विक्री झाली आहे.
गुलाल खरेदीसाठी आगाऊ नोंदणीगुलाल विक्रेत्यांनी सांगितले की, यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या, त्यात मतमोजणीच्या दिवशी दुपारनंतर गुलालाची विक्री झाली होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच कार्यकर्त्यांनी १० दिवस अगोदरपासूनच आगाऊ नोंदणी सुरू केली आहे. काहींनी गुलाल खरेदी केला, तर काहींनी नोंदणी केली व मतमोजणीच्या दिवशी गुलाल नेणार आहेत.
सकाळी ११ वाजेनंतर गुलालाच्या विक्रीला वेगव्यापाऱ्यांनी सांगितले की, कोणता उमेदवार मतमोजणीत पुढे आहे, याचा अंदाज ११ वाजेनंतर येतो. त्यानुसार कार्यकर्ते गुलाल खरेदीसाठी बाजारात येतील. दुपारी ३ ते ६ वाजेदरम्यान सर्वाधिक गुलालाची विक्री होत असते.
कोणत्या निवडणुकीत उडविला जातो सर्वाधिक गुलालव्यापाऱ्यांनी सांगितले की, सर्वाधिक गुलाल ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उधळला जातो. सुमारे ५० ते ६० टन गुलाल त्यावेळीस विकला जाताे. त्यानंतर महानगरपालिका, विधानसभा निवडणुकीत, तर सर्वात कमी गुलाल लोकसभा निवडणुकीत उडविला जातो.