घाटनांद्रा : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सिलिंडरच्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील महिला आता त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे आता गॅस नको रे बाप्पा, त्यापेक्षा आपली चुलच बरी अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पुन्हा ग्रामीण भागातील महिला सरपण गोळा करण्यासाठी रानावनात फिरू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या गॅस दरवाढीमुळे त्यांच्यावर ही आलेली वेळ त्यांना अच्छे दिनच्या आश्वासनांची आठवण करून देत आहे.
चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये डोळ्याचे आजार बळावले होते. त्याचबरोबर चूल पेटविण्यासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे जंगल तोडीचे प्रमाण वाढले होते. महिलांचे आजार, वृक्षतोड व पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित केली. या योजनेचा लाभ घाटनांद्रा परिसरातील गोरगरीब कुटुंबीयांना देखील झाला. मोफत गॅस सिलिंडर वितरित करून योजनेचा गवगवा झाला; परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे घराघरातील गॅस सिलिंडर आता शोभेची वस्तू बनली आहे. सिलिंडरची किंमत ८७० रुपयांवर जाऊन पोहचली आहे. त्यात शासनाकडून मिळणारे अनुदानही बंद करण्यात आले. त्यामुळे आता महिला जंगलात जाऊन सरपण जमा करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. या प्रकारामुळे भविष्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढणार असून पुन्हा महिलांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात याव्यात, अशी मागणी महिला वर्गामधून होऊ लागली आहे.
-
पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर मिळाल्याने खूप आनंद झाला होता. तेव्हा धुरापासून आपली मुक्तता झाली असे वाटले. मात्र, दररोज वाढत जाणारे सिलिंडरचे भाव हे न परवडणारे आहेत. त्यामुळे पुन्हा चुलीचा वापर सुरू केला. - सोनाली मोरे, गृहिणी.
फोटो : घाटनांद्रा येथे चुलीवर स्वयंपाक करताना महिला तर गॅसचे सिलिंडर दिसत आहे. (दत्ता जोशी क्षेत्रात)