- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : पिचकारीने रंग उडविला जातो. मात्र, यंदा रंग उडविण्यासाठी चक्क नॅनो सिलिंडर बाजारात आले आहेत. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटले असेल, मात्र हे तेवढेच सत्य आहे. २ व ४ लिटरच्या या लोखंडी सिलिंडरचे नोझल दाबताच वेगाने रंग हवेत पसरतो. आजूबाजूला कोणीच दिसत नाही. फक्त सर्वत्र रंगच रंग दिसतो. छोटे अग्निशमन सिलिंडर असतात, तशाच आकारातील हे नॅनो सिलिंडर आहेत. एवढेच नव्हे तर रंगाचा स्प्रे, रंगाचा धूर असे नावीन्यपूर्ण प्रकार बाजारात दाखल झाले आहेत, जे यंदाच्या धुलीवंदनाचे वैशिष्ट्य असेल. यामुळे कोणी यंदा सिलिंडरने रंग उडवत असेल, तर आश्चर्य वाटू नये.
धुलिवंदन ७ मार्चला आहे. यंदा ‘जरा हटके’ काय आहे, असा प्रश्न विचारणारे असंख्य ग्राहक आहेत. हौसेला मोल नसते म्हणतात, ते सणांना दिसते. उत्तर प्रदेशातील हाथरसमधून नॅनो सिलिंडर शहरात आणण्यात आले आहेत. त्याला एक मीटरही बसविण्यात आला आहे. सिलिंडर किती रिकामा झाला, हे त्या मीटरवर दिसते. या नॅनो सिलिंडरची किंमत ४०० ते १,५०० रुपये दरम्यान आहे. याशिवाय ‘फोम स्प्रे’सुद्धा विक्रीला आले आहेत. या स्प्रेचा रंग फोम स्वरूपात असल्याने तो हवेतच विरघळून जातो. तसेच ‘मखमली, मुलायम असा इंग्लिश गुलाल’ नावीन्यपूर्ण ठरत आहे. व्हेलवेट कलर म्हणून तो ओळखला जातो. हा गुलाल लावल्यावर लगेच निघूनही जातो. विशेष म्हणजे हे ब्रँडेड रंग असे बनविले आहेत की, त्वचेची काळजी घेण्यात आली आहे.
पिचकारीतून उडवा सात्विक रंगशहरात आता भरड धान्याचा वापर करून सात्विक रंग बनविण्यात आला आहे. डाळमिलमध्ये डाळी, मका आदी धान्यांचा भरडा काढून सात्विक रंग तयार केला आहे. विशेष म्हणजे सात्विक रंग किंवा कोरडा रंग उडविण्यासाठी खास पिचकारी बाजारात आली आहे. त्यामुळे रंग खेळताना पिचकारीत पाण्याची गरज लागणार नाही, खाल्ले तरी पौष्टिक व चेहऱ्यालाही ‘स्क्रब’ म्हणून वापरता येईल, अशी माहिती व्यापारी राहुल गुगळे यांनी दिली.