औरंगाबाद: शिंदे- फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित विस्तार आज पार पडला. यात शिंदे गट आणि भाजपचेयं प्रत्येकी ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदार संजय शिरसाट हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया देत, कोणीही नाराज नसल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्तांतर झाले. ३० जून रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. मात्र, आज झालेल्या मंतीमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. यामुळे ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. शिरसाट यांच्यासोबत भरत गोगावले देखील नाराज असल्याची माहिती आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्याला तीन मंत्रीपद मिळाली. यात शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपच्या अतुल सावे यांचा समावेश आहे. दरम्यान, शपथविधी पार पडल्यानंतर भुमरे यांनी आमच्यातील कोणीही नाराज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तसेचा यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार होईलच त्यात अनेकांना संधी मिळेल असेही भुमरे म्हणाले.
शिंदे गटाचा आक्रमक चेहरा मंत्रिमंडळातून नाहीपहिल्या मंतीमंडळ विस्तारात शिंदे गटातून संजय शिरसाट, भरत गोगावले, बच्चू कडू यांची नावं वगळण्यात आली. त्यामुळे हे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून प्रचंड मतभेद झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे आणखी एक आमदार संजय शिरसाट शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे समजल्याने त्यांची आणि शिंदे यांची वादावादी झाल्याचे समजते आहे. रात्री शिंदे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना देखील शिरसाट यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, असे वृत्त एबीपी माझा यांनी दिले आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढत टीकेची झोड उठवली. औरंगाबाद शहरात देखील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना एकट्याने तोंड दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेली जवळीकता शिरसाट यांना मंत्रिपद मिळवून देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही.