- अनिलकुमार मेहेत्रेपाचोड ( छत्रपती संभाजीनगर) : मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण सरकारचे कोणीही त्यांच्यासोबत उभे नाही. मागच्या वेळी कृषिमंत्री असलेले यावेळी पालकमंत्री आहेत, ते त्यावेळी देखील फिरकले नाहीत. आता कृषिमंत्री कोणीतरी दुसरे आहे, नाव देखील माहिती नाही राज्याला, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला.
शेतकऱ्यांना मदत करताना राजकारण करू नये. माझा पाहणी दौरा जाहीर झाला त्यानंतर आता सरकर सक्रिय झाल्याची टीका ठाकरे यांनी केली. तसेच राष्ट्रपती देखील मराठवाड्यात आहेत, त्यांनी गंभीर पुर परिस्थितीची नोंद घेऊन सूचना कराव्यात अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
पैठण तालुक्यात शनिवारी रविवारी व सोमवारी पाचोड गावासह विविध गावात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पाचोड परिसरातील गल्हाटी नदीला महापूर आल्यामुळे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी संजय नागोराव भुमरे पाटील यांची तर चक्क अडीच एकर जमीन खरडून वाहून गेली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी साडे आकरा वाजता पाचोडला आले. आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणचे नुकसानग्रस्त शेतकरी राजेश शेठी व माणिक शेळके शेतात जाऊन पावसाने नुकसान झालेल्या कपाशीची पाहणी केली.
यावेळी शेतकरी माणिक शेळके व राजेश सेठी यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे समोर आपली कैफियत मांडली. तीन दिवस पडलेल्या पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तर माणिक शेळके या शेतकऱ्यांनी सांगितले की, पाचोड ते अंबड रोड झाल्यामुळे बाजूला प्लॉट पडले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पुलाची दुरुस्ती न केल्यामुळे पावसाचे पाणी दरवर्षी माझ्या शेतात येत असल्याने दरवर्षी माझे अतोनात नुकसान होत असल्याचे सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडून पैठण तालुक्यातील नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय गोर्डे, अॅड. बद्रीनारायण भुमरे, माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड, शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे, संजय भुमरे, आनिस पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.