औरंगाबाद : ‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण यांना सहज देता आले असते; परंतु राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण न्यायप्रविष्ट करून टाकण्यात आले. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही तेच घडतेय. आता महादेव जानकरसुद्धा तोंड लपवून फिरताहेत. धनगर समाजाच्या मेळाव्यांना जायचे टाळताहेत. मुस्लिम आरक्षण तर यांना द्यायचेच नाही, अशा तिखट शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या पावसाळी अधिवेशनास रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी संघभूमी नागपूर येथून केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतले जात आहे. मात्र, चार वर्षांत औरंगाबादला मंत्रिमंडळाची एक बैठक घ्यायला यांना वेळ मिळाला नाही. दरवर्षी हे बैठक घेऊ शकले नाहीत, अशी खंत व्यक्त करून चव्हाण यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व योजना नागपूरला पळविण्याच्या मागे आहेत. स्पाचा साधा प्रस्तावही या सरकारने केंद्राकडे पाठवला नाही. आता याला तीन वर्षे झाली. आयआयएमही असेच पळविले गेले.खैरेंनी पिठाची गिरणी तरी आणली का ? कोण खैरे? हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली मते लुबाडण्याचा त्यांचा धंदा... चार-चार वेळा निवडून येऊनही यांनी एक साधी पिठाची गिरणी तरी आपल्या मतदारसंघात आणली का? त्यापेक्षा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे बरे! त्यांनी तरी काही संस्था जालना मतदारसंघात आणून दाखविल्या, असे सांगत आ. सतीश चव्हाण आणखी म्हणाले की, यांनी चार निवडणुका अशाच जिंकल्या. फक्त चारच नावे घ्यायची. आई तुळजा भवानी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे... यापलीकडे काही नाही. लोकसभेतही यांचा काहीच परफॉर्ममन्स नाही. पक्षाने आदेश दिल्यास मी खैरेंविरुद्ध निवडणूक लढवायला तयार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
विद्यापीठातील गैरव्यवहारावर आवाज उठविणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना त्वरित सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी करून चव्हाण यांनी विद्यापीठातील गैरव्यवहारप्रकरणी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे घोषित केले व विद्यापीठात सध्या कायदा पायदळी तुडवून कारभार चालू असल्याचा आरोप केला. विद्यापीठाला कुलगुरूंनी ५० वर्षे मागे नेले अशीही टीका त्यांनी केली.