छत्रपती संभाजीनगर: जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत राज्यातील विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला नाही. यामुळे राज्यात काही काळ राष्ट्रपती राजवट लागेल आणि डिसेंबरमध्ये नवीन विधानसभा अस्तित्वात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही, तर येत्या २६ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल, असा दावा आज शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला. विरोधकांच्या वल्गना पूर्ण होणार नाहीत, असा इशारा देखील शिरसाट यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेस संबोधित करताना दिला.
आमदार शिरसाट पुढे म्हणाले, बदलापूर येथील घटनेत अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहजे. कायदा गेला उडत. सरकार कारवाई करेल मात्र एक निर्णय घेण्याची गरज आहे. महिलेवर अत्याचार होत असेल तर जरब बसला पाहिजे. आता सहनशिलतेचा अंत झाला आहे. या घटनेचे कुणी राजकारण करू नका, यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहजे. नराधमाला ठेचायची वेळ आली तर सुरुवात आम्ही करू, आरोपी भेटलं तर त्याला रस्त्यात ठेचा.यासाठी कायदा हातात घेतला तर चालेल, असा संताप शिरसाट यांनी व्यक्त केला. तसेच सरकार काम करत आहे. लिंगपिसाट लोकांवर कठोर कारवाई झाली पाहजे. यावर प्रकरणी आरोप करून प्रसिध्दी घ्या, मात्र या विषयाचं राजकारण करू नका, असे विरोधकांना आवाहनही आ. शिरसाट यांनी केले.
...म्हणून विरोधकांना त्रास होतोयलाडकी बहिण योजना अनेक वर्ष सत्तेत असलेल्या, जनतेला केवळ प्रलोभन देणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली चपराक आहे. बहिणीच्या खात्यात पैसे जात आहेत तर यांची पोटदुखी होत आहे, असा आरोप आ. शिरसाट यांनी केले. रक्षाबंधन पूर्वी पैसे द्यायचे होते. २ कोटी महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसे आल्याने विरोधकांना त्रास होत आहे. मात्र, आमच्या बहिणींना यामुळे आत्मविश्वास आला यात आमचं यश आहे, असेही शिरसाट म्हणाले.
रामगिरी महाराज यांच्या पाठीशीरामगिरी महाराजांनी काय चुकीचं बोलले. ते संबंधित ग्रंथाच्या आधारावर बोलले आहेत. एखाद्या समाजाचा दबाव चालणार नाही. महाराज चुकीचं बोलले नाहीत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे शिरसाट यांनी जाहीर केले.