- संतोष हिरेमठऔरंगाबाद : ग्रामीण भागात खासगी रुग्णालय सुरू करणे, तेही विनानोंदणी, हे अगदी किराणा दुकान टाकावे, इतके सोपे असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या रुग्णालयाला परवानगी आहे का? तेथील डाॅक्टर नोंदणीकृत आहेत की बोगस? हेही सहा-सहा महिने पाहिले जात नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. हा सर्व रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
खासगी रुग्णालय सुरू करताना बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ग्रामीण भागात ३३३ खासगी रुग्णालयांनी नोंदणी केलेली आहे. चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात अवैध गर्भपाताचा प्रकार समोर आला. या रुग्णालयाची बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणीच नसल्याचेही समोर आले. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून हे रुग्णालय सुरू असताना, त्याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्षही गेले नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध आणि बोगस रुग्णालयांत नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहेत.
ग्रामपंचायतींचे दुर्लक्षएखाद्या गावात नवीन रुग्णालय सुरू होत असेल, तर त्याची माहिती ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णालयात जाऊन नोंदणीकृत डाॅक्टर आहे का? बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणीच्या दृष्टीने सोईसुविधा, अग्निशमन यंत्रणा आहे का? याची पडताळणी केली जाते. चितेगाव ग्रामपंचायतीने औरंगाबाद स्त्री रुग्णालयासंदर्भात माहितीच कळविली नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुसज्ज शस्त्रक्रियागृहाचा फक्त फलकचचितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयातील महिला ‘बीएचएमएस’ डाॅक्टर असल्याचे प्रमाणपत्रावरून समोर आले आहे. या ठिकाणी मात्र, सुसज्ज शस्त्रक्रियागृहासह सिझेरियन प्रसूती, ब्रेस्टच्या गाठीची शस्त्रक्रिया, स्त्री-पुरुष बीज प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आदी सुविधा असल्याचा फलक लावण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या दृष्टीने कोणीही यंत्रणा नव्हती. लिहिलेल्या सुविधा वाचून आरोग्य यंत्रणाही चक्रावून गेली.
वेळोवेळी तपासणीग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी केली जाते. नवीन रुग्णालय सुरू होत असेल, तर ग्रामपंचायतीकडून आम्हाला माहिती दिली जाते आणि त्यानंतर रुग्णालयाची आवश्यक ती तपासणी केली जाते. औरंगाबाद स्त्री रुग्णालयाने बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार नोंदणी केलेली नव्हती, शिवाय गर्भपात केंद्र म्हणूनही ते मान्यताप्राप्त नाही.- डाॅ.अभय धानोरकर, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी.
ग्रामीण भागातील नोंदणीकृत खासगी रुग्णालये : तालुका - संख्याऔरंगाबाद : १०२, वैजापूर : १६, गंगापूर : ६१, पैठण : ५१, कन्नड : ४३, सिल्लोड : १८, फुलंब्री : १६, खुलताबाद : २०, सोयगाव : ०६