औरंगाबाद : ब्राह्मण समाज कधीच आरक्षण मागणार नाही. स्वबळावर समाजाची व देशाचा प्रगती साधणार आहे. ब्राह्मण युवकांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती ते वस्तीगृहापर्यंतची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय व उद्योगात यावे, यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असा निर्णय ब्राह्मण समाज समन्वय समितीने घेतला आहे.
शहरातील ब्राह्मण समाजातील विविध २५ संघटनांनी एकत्र येऊन ब्राह्मण समाज समन्वय समितीची स्थापना दोन वर्षापूर्वी करण्यात आली. संघटनेच्या वतीने येत्या ५ नोव्हेंबर रोजी दिवाळी स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजालाही आता आरक्षण हवे, अशा चुकीच्या बातम्या मध्यंतरी पसरल्या होत्या. मात्र, ब्राह्मण समाजाने कधी आरक्षण मागितले नाही. आणि भविष्यात कधी आरक्षण मागणार नाही. अशी स्पष्ट व ठोस भूमिका ब्राह्मण समाज समन्वय समितीने घेतली आहे.
समाज स्वबळावर प्रगती साधण्यास सक्षम आहे. समाजातील नवपिढीला आत्मनिर्भर व सक्षम बनविण्यासाठी समितीने कार्य हाती घेतले आहे. समाजात अनेक गरीब कुटूंब आहेत त्यातील हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य करण्यात येत आहे. तसेच समाजाने व्यावसायिक व उद्योजकांची संघटना तयार केली आहे. याद्वारे युवकांना कौशल्यप्रशिक्षण देणे व नोकरीला लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच समाजातील जास्तीतजास्त युवकांनी व्यवसाय सुरु करावा तसेच उद्योग उभारावा यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने संघटनात्मक कार्य सुरु आहे.
बीबीएनचे मंगेश पळसकर यांनी सांगितले की, ब्राह्मण बिझनेस नेटवर्कच्या माध्यमातून आजपर्यंत ३० कोटीची उलाढाल झाली आहे. तसेच आता व्यवसाय व उद्योगासाठी लागणारे भांडवल उभे करुन देण्यासाठी दोन बँकाही तयार झाल्या आहेत. यामुळे भविष्यात ब्राह्मण समाजातील युवक नोकरीपेक्षा उद्योेग व्यवसायात अधिक प्रमाणात पुढे येतील, असेही पळसकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यासाठी अनेक उद्योजक,व्यावसायिक पुढे आले आहेत. संपूर्ण समाजाच्या सहकार्याने येत्या दोन वर्षात शहरात भव्य वसतीगृह उभारण्यात येईल,अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी दिली.