महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:55 PM2024-10-21T18:55:59+5:302024-10-21T18:56:58+5:30

एमआयएम सर्व पक्षांचे उमेदवार घोषित झाल्यावर आपले उमेदवार जाहीर करणार

No response from Congress leaders in Maharashtra; Congress-MIM alliance discussed starts in Delhi | महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिसाद नाही; आता एमआयएम-काँग्रेस युतीवर दिल्लीत चर्चा

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीसोबत अनेकदा युती करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. युतीसोबतची चर्चा पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेते यांच्यात सुरू आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत निर्णय होईल. एमआयएम सर्व पक्षांचे उमेदवार घोषित झाल्यावर आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम आपल्या उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर रविवारी भाजपाने ९९ उमेदवारांची घोषणा करून आघाडी घेतली. सोमवारपासून अन्य पक्षांचे उमेदवारही जाहीर होतील. एमआयएम आपल्या उमेदवारांची घोषणा कधी करणार यासंदर्भात इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत एमआयएम पक्षालाही घ्यावे असा प्रस्ताव अनेकदा दिला. राज्यातील काही काँग्रेस नेत्यांसोबत माझी प्राथमिक स्तरावर चर्चाही झाली. त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. युतीसंदर्भात स्वत: पक्षाचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करीत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. युतीसंदर्भात निर्णय लवकर व्हावा ही माझीही इच्छा आहे. किती दिवस आम्ही वाट पाहावी हा प्रश्न आहे.

मंगळवारी पक्षप्रमुखांसोबत चर्चा
मंगळवारी मी हैदराबादला जाणार आहे. तेथे पक्षप्रमुखांना राज्यातील परिस्थिती संदर्भात माहिती देणार आहे. उमेदवारांसंदर्भात चर्चा होईल. कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय ते स्वत: घेतील. उमेदवार जाहीर करण्याची आम्ही अजिबात घाई करणार नाही. सर्वांत शेवटी एमआयएम पक्षाचे उमेदवार जाहीर होतील. किती जागा लढविणार हेसुद्धा मी जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: No response from Congress leaders in Maharashtra; Congress-MIM alliance discussed starts in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.