छत्रपती संभाजीनगर : ‘ना कुठे विश्रांतीची सोय, ना विमा, ना कोणत्या सुविधा, तासन्तास ‘स्टेअरिंग’वरच..’ ही अवस्था आहे प्रवासी वाहनांपासून तर मालवाहू वाहनांच्या चालकांची. रोज शेकडो अंतर कापणाऱ्या या चालकांपर्यंत शासनाकडून कोणत्याही सुविधा पोहोचत नसल्याची ओरड होत आहे.
असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग यांच्या वतीने २४ जानेवारी राेजी देशभरात चालक दिन साजरा होत आहे. एसटीपासून विविध विभागांनी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. हा दिवस साजरा होत आहे; परंतु चालकांच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार, असा सवाल विविध संघटनांकडून उपस्थित होत आहे.
चालकांच्या मागण्या...- धार्मिक आणि पर्यटनस्थळी, मंगल कार्यालये, रुग्णालये आणि महामार्गांवर ठिकठिकाणी विश्रांतीची सुविधा.- वाहन चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना.- जखमी चालक आणि मृत्युमुखी पडणाऱ्या चालकाच्या परिवारास मदत मिळण्यासाठी वैयक्तिक अपघात विमा पाॅलिसीची तरतूद. ५ लाख रुपयांची मदत.- चालकांसाठी वेळोवेळी रस्ता सुरक्षा जनजागृतीपर कार्यक्रम, वेळोवेळी आरोग्य तपासणी.- ड्रायव्हिंगचे तास निश्चित असावेत.
जिल्ह्यातील वाहनांची संख्यावाहन - संख्या- टूरिस्ट कॅब- ३,७३५- रिक्षा- ३६,२८३- मिनी बस-२,५२९- ट्रक-१७,७०७- टँकर-४,७७७- ट्रेलर - १७,८५३- एसटी बस- ५३९
फक्त घोषणा, गाइडलाइन नसल्याचे कारणसंघटनेत जिल्ह्यातील २२ हजार चालकांची नोंद आहे. तेलंगणात छोट्या प्रवासी वाहन चालकांसाठी ५ लाख रुपयांचा अपघाती विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशी योजना नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेचा अध्यादेश काढलेला आहे; परंतु शासनाच्या गाइडलाइन नाहीत, असे सांगून उपचार नाकारले जातात. आर्थिक महामंडळाबाबत फक्त घोषणा केल्या जातात.- संजय हाळनोर, संस्थापक अध्यक्ष, जय संघर्ष वाहन चालक, चालक-मालक संघटना
एसटीत काय स्थिती ?एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात ८३७ चालक आणि २९९ चालक तथा वाहक आहेत. एसटी चालकांची नियमित आरोग्य व नेत्रतपासणी होते. सुरक्षित बस चालवणाऱ्या चालकांना विनाअपघात सेवेचे ५, १०, १५ वर्षांचे बिल्ले वितरित करण्यात येतात व त्यांचा सत्कार करण्यात येतो. २५ वर्षे विनाअपघात सेवा केलेल्या चालकांना २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो.