मल्हारीकांत देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुठलेच शास्त्र शाश्वत स्वरूपाचे नसते काळानुसार त्यात बदल घडत असतो. शास्त्राची निर्मिती प्रयोगातून होते. प्रयोग हे शास्त्राच्या आधी आणि नंतरही घडत असतात हा सर्जनात्मक अधिकार जाणकारांनी समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात विचारवंत व लेखक अशोक वाजपेयी यांनी केले.महागामीतर्फे आयोजित शारंगदेव संगीत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, विविध परंपरेचा समुच्चय हे या देशाचे वैशिष्ट्य व बलस्थान राहिले आहे. अभिजात परंपरेचा उल्लेख करताना इतरही परंपरांचा विसर पडू नये. गायन परंपरेत मार्गीच्या जागेवर ख्याल आलाच ना! १९ व्या शतकापर्यंत संगीतात असे भेद नव्हते. नृत्याच्या क्षेत्रात आजही बंदिस्तपणा अधिक जाणवतो. शास्त्र आणि व्याकरण गातो, तो गायक, पण रागाला आपले करून गातो तो महान गायक ठरतो, असे पं. भीमसेन म्हणायचे.परिवर्तनाशिवाय तुमचे वेगळेपण दिसणार नाही. शास्त्राचा अस्वीकार करू नका; परंतु त्यात नवता भरली पाहिजे. आपल्या गुरूला श्रेष्ठ म्हणा; परंतु आपलेच गुरू सर्वश्रेष्ठ ठरवाल तर इतरांचे चांगले गुण तुम्हाला टिपता येणार नाहीत. सहचर्य ही आमची धारणा बनली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.ख्याल गायकीवर चर्चाधृपद धमारनंतर गायन क्षेत्रात ख्याल रूढ झाला. ख्याल गायकीने सातत्याने परिवर्तन स्वीकारल्यामुळे ही पद्धती रूढ व विकसित होते आहे. लय, तालाशी खेळत खेळत स्वरांचा विस्तार, आलाप ताना, बहेलावे, गमक स्वरांचा वापर, मींड यामुळे गायन प्रकारात विविधता आली आहे, असे प्रतिपादन ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी केले.किन्नरी वादनदर्शनम् मोगलैया या दक्षिणेतील किन्नरी वीणा वादक लोककलावंताने आपल्यावादन शैलीने सर्वांना मोहून टाकले. या ग्रामीण कलावंताला आणि त्याच्या कलेला राजाश्रय मिळवून देणा-या डॉ. दासरी रंगय्या यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. कलावंत व रसिक श्रोत्यांमध्ये मात्र भाषिक अडसर येत गेल्यामुळे अवघ्या वीस वीस मिनिटांत हे सादरीकरण संपवण्यात आले.शारंगदेव संगीत महोत्सवाची सांगता पार्वती दत्ता यांच्या कथ्थक नृत्य व ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या गायनाने झाली. या महोत्सवाचे हे नववे वर्ष होते. शास्त्र आणि परंपरा यांचा अनोखा मेळ घालणारा हा देशपातळीवरील संगीतोत्सव महागामीची एक देण म्हणावी लागेल.
कुठलेही शास्त्र शाश्वत नसते - अशोक वाजपेयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:35 AM