छत्रपती संभाजीनगर : शहरात रविवारी मध्यरात्री आंतरराज्य टोळीने दीड तासात दोन ठिकाणी एटीएम सेंटर फाेडून लाखो रुपये पळवले. रांजणगावच्या एचडीएफसीच्या एटीएमसेंटरमधील रोख रक्कम रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही. तर कांचनवाडीच्या एसबीआयच्या एटीएम सेंटरमधून २२ लाख ७७ हजार रुपये चोरांनी लंपास केले. एम-२ भागात एका चोराने एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला.
पहिली घटना रविवारी रात्री दोन वाजता कांचनवाडीत घडली. एसबीआय बँकेचे कांचनवाडीच्या शिवनेरी काॅम्प्लेक्समधील एटीएम सेंटर फोडले. चार ते पाच जणांचे टाेळक्याने एटीएम सेंटरपासून काही अंतरावर कार उभी केली. एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्हीवर स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरने एटीएम मशिनचे कॅश ट्रेच तोडत २२ लाख ७७ हजार ५०० रुपये चोरले. सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली. फायनान्शियल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स प्रा. लि. या खासगी कंपनीकडे याच्या देखभालीची जबाबदारी आहे. कंपनीचे अधिकारी रमेश इधाटे यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी गेले.
एम-२ मध्ये प्रयत्नएम-२ मध्ये अडीच वाजेच्या सुमारास चोरांनी एसबीआयचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ प्रयत्न करूनही यश आले नाही.
दोन ते पावणेतीन, नाशिकच्याच घटनेतील टोळी-दरवर्षी एटीएम सेंटर फोडणारी टोळी राज्यात सक्रिय होते. यात बहुतांश वेळा हरियाणाची टोळी असल्याचे सिध्द झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिक येथील एटीएम फोडणाऱ्या टोळीनेच रविवारी मध्यरात्री शहरात प्रवेश केल्याचा संशय आहे. दोन्ही घटनांत क्रेटा गाडीचा वापर झाला आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात ते एटीएम मशिन गॅस कटरने फोडतात. दोन ते पावणेतीनमध्ये कांचनवाडी ते रांजणगावमध्ये त्यांनी दोन एटीएम फोडले.