औरंगाबाद : घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल २७४ पदे रिक्त आहेत. परिणामी, नातेवाइकांनाच स्ट्रेचर ओढावे लागत आहे. एवढेच नाही, तर कर्मचाऱ्यांअभावी स्वच्छतेपासून रुग्णसेवेच्या कामांवरही परिणाम होत आहे.
घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ७४४ पदे मंजूर आहेत. यापैकी आजघडीला ४३६ पदे भरलेली आहेत. याबरोबर २९-२९ दिवसांच्या कराराचे ३४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आजघडीला तब्बल २७४ पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांपैकी १७५ पदे ही कमी करण्याच्या हालचाली कोरोनापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय स्तरावर सुरू होत्या; परंतु अद्यापही ही पदे कमी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही १७५ पदे कमी करण्यात येऊ नये आणि एकूण २७४ रिक्त पदांपैकी २५० पदे किमान कंत्राटी, बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास २४ ऑगस्ट रोजी सादर केला आहे.
---
अडचणी दूर होतील
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रुग्णसेवेतील अडचणी दूर होतील, अशी आशा आहे.
-डाॅ. काशीनाथ चौधरी, वैद्यकीय अधीक्षक.