औरंगाबाद : शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरात तब्बल ५० हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा असून, मनपाकडे लसचा एकही डोस उपलब्ध नाही. लस कधी येईल, हे सुद्धा निश्चित सांगता येत नाही. ( 50,000 citizens waiting for second dose of corona in Aurangabad )
१८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याच्या निर्णयाची २२ जूनपासून औरंगाबादेत अंमलबजावणी सुरू झाली. लसीकरण मोहिमेला तरुणाईने उदंड प्रतिसाद दिला. त्यापूर्वी लसीचा पहिला डोस घेतलेल्या जवळपास ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना आठ ते दहा दिवसांपासून लसची प्रतीक्षा करीत आहेत. दुसरा डोस घ्यावा म्हणून मोबाइलवर मेसेज येत आहेत; मात्र महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर डोसचा ठणठणाट आहे. सोमवारी मध्यरात्री मनपाला १० हजार डोस प्राप्त झाले होते. मंगळवारी दिवसभरात हे डोस संपले. बुधवारी लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागली. गुरुवारीही लसीकरण होणार नाही. आतापर्यंत शहरात ४ लाख ७९ हजार ९७६ नागरिकांना पहिला, दुसरा डोस देण्यात आला. ८४ दिवस उलटल्यानंतरही नागरिकांना दुसरा डोस मिळत नाही.
अचानक लोकसंख्येचे निकषऔरंगाबाद जिल्ह्याला शासनाकडून जेवढा साठा मिळत होता, त्यातील ५० टक्के वाटा महापालिकेला देण्यात येत होता. मागील काही दिवसांपासून स्थानिक प्रशासनाने लोकसंख्येचा निकष लावत मनपाला कमी डोस देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सोमवारी रात्री २६ हजार डोस मिळाले. त्यातील १० हजार डोस मनपाला देण्यात आले.
लसची मागणी अधिक वाढलीमहापालिकेने शहरात ८२ ठिकाणी लसीकरण करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. दररोज किमान १८ ते २० हजार नागरिकांना लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणाही उभारण्यात आली; मात्र लस कमी मिळत असल्याने ३९ लसीकरण केंद्र सुरू ठेवावे लागत आहेत. लसीकरण बंद असले तरी शेकडो नागरिक दररोज लसीकरण केंद्रांवर चकरा मारत आहेत.
शहरातील लसीकरणाची आकडेवारीपहिला डोस - ३, ६८,६४१दुसरा डोस- १,११,३३५