औरंगाबाद : शहर आणि परिसरात कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. त्यातच आठ दिवसांपासून अर्ध्याहून अधिक शहराला ताप, अंगदुखी, सर्दी अशा व्हायरल आजाराने ग्रासले आहे. खासगी डॉक्टरांकडे लांबलचक रांगा दिसून येत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजार समजून औषधोपचार सुरू केले आहेत.
१५ मार्च रोजी औरंगाबाद शहरात 'कोरोना' संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्या प्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप असला तरी कोरोनाची भीती वाटत होती. खासगी डॉक्टर पटकन कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देत होते. कोरोना तपासणी टाळण्यासाठी अनेकजण दुखणे अंगावर काढत होते. मागील वर्षभराचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता महापालिकेच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रांवर रांगा लावून टेस्ट करीत आहेत. दररोज ५ हजार तपासण्या करण्यात येत आहेत. त्यात ७०० ते ८०० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत.
एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अर्ध्याहून अधिक शहरातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक खासगी डॉक्टरकडे दिवसभरातून किमान शंभर रुग्ण व्हायरल आजाराचे येत आहेत. डॉक्टर रुग्णांना नेहमीप्रमाणे व्हायरल डिसीज समजून औषधोपचार करीत आहेत. तीन ते चार दिवसानंतरही ताप कमी न झाल्यास, कोरोना तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. त्यात बहुतांशी नागरिक निगेटिव्ह येत आहेत. कितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही. ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
रुग्णसंख्या प्रचंड वाढलीवातावरणातील बदलामुळे शहरात ताप असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. डायरिया आणि सर्दीच्या रुग्णांची ही संख्या वाढलेली दिसून येते. तीन ते पाच दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास रुग्णांनी पटकन कोरोना टेस्ट करून घ्यावी. काही साथीचे आजारही वाढत आहेत.- संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन.