औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख विरुद्ध सिडको ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात अद्याप आरोपीविरुद्ध तांत्रिक पुरावा मिळाला नसल्याची, माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
उपायुक्त म्हणाले की, २६ डिसेंबर रोजी सिडको पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मेहबूब शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातील वातावरण खराब होऊ लागले. या प्रकरणाचा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने केला जात आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. त्यांच्या मदतीसाठी तीन पोलीस अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता हे स्वतः या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत.
आजपर्यंत झालेल्या तपासामध्ये पीडित महिला आणि आरोपी यांच्या मोबाईलचे एक वर्षापासूनचे कॉल डिटेल पोलिसांनी तपासले आहे. त्यांच्यात संभाषण झाल्याचे दिसून येत नाही. एवढेच नव्हे तर त्यांचे मोबाईल एकाच टॉवर खाली कधीही आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. असे असले तरी पोलीस या प्रकरणात चोहोबाजूंनी तपास करीत आहेत. पिडिता आणि आरोपी याच्यात व्हॉट्सॲप कॉलिंग झाली होती का? असे विचारले असता त्यांनी अद्याप माहिती समोर आली नसल्याचे सांगितले. शिवाय अन्य पुरावे मिळते का याविषयी तपास करीत असल्याचे उपायुक्त यांनी नमूद केले.
अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही तपासात आरोपींविरुद्ध तांत्रिक पुरावा नाही, या तुमच्या विधानाचा पिडितेवर काय परिणाम होईल असे विचारले असता उपायुक्त यांनी आम्ही सत्य माहिती सांगितली शिवाय या गुंह्याच्या कोणत्याही अंतिम निष्कर्षाप्रत आम्ही आलो नाही.
अटक करण्याचा अधिकार तपास अधिकाऱ्यांचा बलात्काराच्या गंभीर गुंह्यातील आरोपीला अटक कधी करणार या प्रश्नाचे उत्तर देतांना उपायुक्त गिऱ्हे म्हणाले की ,कोणत्याही गुंह्यातील आरोपीला अटक करायची अथवा नाही याचा सर्वस्वी अधिकार तपास अधिकाऱ्यांचा असतो. त्यांच्यासमोर सबळ पुरावे आल्यावर ते आरोपीला अटक करण्याविषयी निर्णय घेऊ शकतात.