छत्रपती संभाजीनगर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार सात फेब्रुवारी मराठवाड्याचा आढावा घेणार होते. त्यांचा दौरा काही कारणास्तव रद्द झाला आहे. दौऱ्याची पुढील तारीख लवकरच जाहीर होईल असे प्रशासनाने कळविले आहे. दौरा रद्द झाल्याने आता मराठवाड्याच्या आढावा बैठकीला मुहूर्त कधी लागणार अशी चर्चा सुरू आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा अचानक रद्द झाला आहे. या दौऱ्यात ते मराठवाडा विभागातील विविध विषयांचा ते आढावा घेणार होते. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची सर्व तयारी करण्यात आली होती. या तयारीवर पाणी फेरले गेले आहे. सलग दोन वेळा महसूल मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने मराठवाडा आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही आढावा बैठक १४ फेब्रुवारीला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अशी होती विभागीय पातळीवरील आढावा बैठकीची तयारी या बैठकीला विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्यासह विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक उपस्थित राहणार होते. यावेळी नोंदणी महानिरीक्षक, जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेण्याचे नियोजित होते. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देखील दुपारचा वेळ राखीव ठेवण्यात आला होता.