औरंगाबाद : ‘यूजीसी’च्या निकषानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कोणत्या विषयाच्या व कोणत्या मार्गदर्शकांकडे किती जागा रिक्त आहेत, याचा खुलासा करायला पाहिजे होता; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा (पेट) कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, संशोधन करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. तथापि, मंगळवारी (दि.१२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी (पेट) ऑनलाइन नोंदणीस येत्या १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे.
’पेट’साठी अगोदर जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमासानुसार १ ते ११ जानेवारीदरम्यान ऑनलाइन नोंदणीची मुदत होती. दरम्यान, आज पुन्हा आठ दिवसांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जानेवारी रोजी ‘पेट’चा पहिला पेपर घेण्यात येणार आहे. या पेपरचा निकाल १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात येईल. दुसरा पेपर २१ फेब्रुवारी रोजी होईल. याचा निकाल १४ फेब्रुवारी रोजी लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २८ फेब्रुवारी रोजी एकत्रित जाहीर केला जाईल व प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी मार्चमध्ये, तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४२ विषयांसाठी ‘पेट‘ होणार असून विषयनिहाय रिक्त जागा व गाइडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे.
‘नेट-सेट’ धारकांना ‘पेट’चा दुसरा टप्पा‘पेट’चा दुसरा टप्पा १ मार्च ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘पेट’ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट’मधून सूट मिळालेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असतील. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी’मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. १ ते १५ मार्च दरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल, तर २० मार्चपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी’ जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या आरआरसी बैठक होणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.