औरंगाबाद : ‘दिवसा तर वाट पाहतोच परंतु रात्री ११ वाजेपर्यंत रांगा लावून टँकरची वाट पाहत बसतो. मात्र, फेरीचा दिवस असूनही पाण्याचे टँकर येत नाही. फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही. नागरिकांचे पाणी व्यावसायिकांना विकण्याचा सर्रास उद्योग सुरू आहे, असा आरोप करीत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही (दि.३०) विविध भागातील नागरिकांनी सिडको, एन-५ येथील जलकुंभावर संताप व्यक्त केला.
जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये महानगरपालिका टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करते. त्यासाठी नागरिकांकडून दर तीन महिन्यांनी पैसे भरले जातात; परंतु पैसे भरूनदेखील सहा-सहा दिवस टँकर फिरकत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून टँकर आलेला नसल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता हनुमाननगर येथील महिलांनी एन-५ येथील जलकुंभ गाठले. याठिकाणी महापालिकेचा एकही कर्मचारी हजर नसल्याचे पाहून महिलांनी एकच संताप व्यक्त केला. अशा परिस्थितीत टँकरला डिझेलपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला, टँकरचालकाला महिलांनी घेराव घालत जाब विचारला. मात्र, त्यांनी आपली कशीबशी सुटका करून घेतली. यापाठोपाठ विश्रांतीनगर येथील नागरिकही याठिकाणी दाखल झाले.
या भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नव्हता. त्यानंतर भारतनगर, राजनगर, शिवनेरी कॉलनी, गजानननगर, चिकलठाणा भागातील नागरिकांनीही संताप व्यक्त करीत याठिकाणी धाव घेतली. टँकर कधी पाठविता, अशी विचारणा नागरिकांकडून होत होती; परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी मनपाचे कोणीही अधिकारी हजर नव्हते. येथील शिपायाने वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला संताप व्यक्त करीत माघारी फिरल्या. पाणी मात्र मिळालेच नाही.
टँकरच्या रांगा, टँकरचालकांना विचारणावीजपुरवठा बंद असल्याने टँकरमध्ये पाणी भरणा बंद पडला होता. परिणामी, टँकरच्या रांगा लागलेल्या होत्या. विविध भागांतून येणारे नागरिक टँकरचालकांना विचारणा करीत होते; परंतु टँकरचालक नागरिकांच्या घोळक्यातून सुटका करून घेत होते.
टँकरचालकांचे थंब घ्यावेज्या वसाहतींसाठी टँकर निघते, त्या भागात टँकर पोहोचत नाही. ते मध्येच कुठेतरी रिकामे होते. त्यामुळे एखाद्या वसाहतीसाठी टँकर रवाना होण्यापूर्वी टँकरचालकांचे हाताचे थंब घ्यावे, म्हणजे टँकर त्याच भागात पोहोचेल आणि मध्येच कुठे गायब होणार नाही, असे नागरिकांनी म्हटले.
पाच दिवस लोटलेपैसे भरूनही पाण्याचे टँकर येत नाही. पाच दिवस उलटले तरीही टँकर आलेले नाही. रांगा लावून वाट पाहण्याची वेळ येत आहे. नागरिकांना पाठविण्यात येणारे टँकर कोणाला तरी विकले जात असल्याची शंका वाटते. भरण्यात येणाऱ्या पैशांच्या तुलनेत किमान १५ ड्रम पाणी मिळाले पाहिजे; परंतु ११ ते १२ ड्रमच पाणी मिळते.- बेबी खंडारे, हनुमाननगर
पाण्याविना दिवससहा-सहा दिवस टँकर येत नाही. आता आज वीजपुरवठा बंद असल्याने एकही टँकर भरणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आजचा दिवसही पाण्याविना गेला. किमान उद्या तरी टँकर येतील, अशी अपेक्षा आहे. - सी.एस. शिंदे, गजानननगर
या भागातील नागरिक आले जलकुंभावर :भारतनगरहनुमाननगरविश्रांतीनगरराजनगरशिवनेरी कॉलनीजयभवानीनगरचिकलठाणा