औरंगाबाद : अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती विद्यापीठात आहे. त्यांना हिऱ्याची किंमत समजण्याची कुवत नसल्याची खंत मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी निरोपाच्या मनोगतात व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अतिरिक्त कुलगुरूपदाचा पदभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडून स्वीकारला. यानंतर मावळते कुलगुरू व प्रकुलगुरूंना कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. चोपडे यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. पाच वर्षांमध्ये खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मात्र, त्या समाजासमोर आल्या नाहीत. मोठ्या प्रमाणात निधी आणला. सत्य आहे त्याचीच बाजू घेतली. जाती-पातीचे राजकारण कधी केले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार घेतला तेव्हा माझ्या हातात तीन केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूपदाचे कॉल लेटर होते. मात्र, केंद्रीय विद्यापीठांना डावलून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि मागास मराठवाड्याचा विकास करण्यासाठी या विद्यापीठाची निवड केली. देशातील क्रमांक एकचे विद्यापीठ बनविण्याचा ध्यास घेतला होता. तो ध्यास पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली; परंतु विद्यापीठात काही विघातक वृत्ती आहेत. त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तरीही विचलित न होता, काम करीत राहिलो. विद्यापीठाचा अर्थसंकल्प १२५ कोटी रुपयांनी वाढविला. याशिवाय नॅक, एनआयआरएफमध्ये झेप घेतली असल्याचेही डॉ. चोपडे यांनी सांगितले. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, कुलगुरूंनी माझ्यावर वडील बंधंूप्रमाणे प्रेम केल्यामुळे काम करता आले. कधीही कामात खोडा घातला नाही. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी करता आल्याचे ते म्हणाले. व्यासपीठावर डॉ. साधना पांडे, नलिनी चोपडे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन करून डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी आभार मानले.चौकट,मतभेद असू द्या, मनभेद नकोप्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येकामध्ये मतभेद असले तरी चालतील. मात्र, मनभेद असू नयेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अध्यक्षीय समारोपात केले. फुले-शाहू-आंबेडकर यांची कर्मभूमी असलेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेत राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:42 PM
अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती विद्यापीठात आहे. त्यांना हिऱ्याची किंमत समजण्याची कुवत नसल्याची खंत मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी निरोपाच्या मनोगतात व्यक्त केली.
ठळक मुद्देबी.ए. चोपडे : विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त पदभार देवानंद शिंदे यांनी घेतला