औरंगाबाद : वेदांतनगरमध्ये उच्चभ्रु वस्तीत घरांच्या समोर लावण्यात आलेल्या अलिशान गाड्यांमध्ये पैशासह इतर साहित्य मिळेल, यासाठी एका नेशखोर चोरट्याने मध्यरात्री १.४५ ते ४.१५ च्या दरम्यान एक, दोन नव्हे तब्बल १७ गाड्या मोठ्या दगडाने फोडल्या आहेत. या गाड्यांमध्ये ठवलेले दोन लॅपटॉप चोरट्याने लंपास केले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत चोरट्यास ताब्यात घेतले आहे.
वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांतनगरमध्ये विविध कंपन्यांचे मालक, नोकरीला असलेल्यांनी घरांच्या समोर अलिशान गाड्या लावल्या होत्या. गुुरुवारी मध्यरात्री १.४५ ते ४.१५ च्या दरम्यान २० वर्ष वयाच्या नशोखोर चोरट्याने रांगेत उभ्या केलेल्या गाड्या फोडण्यास सुरुवात केली. प्रत्येक गाडीच्या काचावर मोठा दगड मारुन काच फोडण्यात आली. त्यानंतर चोरट्याने गाडीचे दरवाजे उघडून आतमधील कप्पे, गाडीची डिक्की उघडून त्यामधील कागदपत्रे उचकटून टाकली. गाडीच्या आतमध्येही काही कप्प्यांची दगडाने तोडफोड केली. हा खटखट्याक कार्यक्रम पावणे दोन वाजेच्या सुमारास मयुर पाटणी यांच्या घराच्या सिसीटीव्ही कैद झाला आहे. यानंतर रांगेने उभ्या असलेल्या प्रत्येक गाडीच्या काचा दगडाने फोडल्या. यातील चार गाड्यांमधून दोन लॅपटॉप, दोन हार्डडिस्क, एका पॉकेटमधून दोन हजार रुपये रोख आणि महागड्या ब्रँडचा एक टिशर्ट चोरट्याने लंपास केला. या घटनेची माहिती गाडी मालकांना सकाळी उठल्यानंतर समजली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, मोठ्या दगडाने गाडीची काच फोडायाची आणि आत प्रवेश करुन गाडीचे कप्पे, डिक्की उघडून पाहिले. यात सापडलेले सामान चोरट्याने बॅगमध्ये भरून नेले. चोरट्याची सर्व हालचाल परिसरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यावरुन पोलिसांनी घेतलेल्या शोधात चोरटा सापडला असून, त्याच्या घरातुन दोन लॅपटॉप जप्त केल्याची माहिती वेदांतनगरचे निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.