औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने ‘कॅस’ (करिअर अॅडव्हान्स स्कीम) अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदतवाढ दिल्यामुळे प्राध्यापक सुखावले आहेत. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये कार्यरत प्राध्यापकांना वेतनश्रेणी व पदोन्नती मिळण्यासाठी ‘कॅस’अंतर्गत वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक सादर करावा लागतो. दरवर्षी विद्यापीठामार्फत असे प्रस्ताव मागविले जातात. चालू शैक्षणिक वर्षात २३ आॅगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन व तत्पूर्वी ‘ओपन डे’ कार्यक्रम घेण्यात आले. दुसरीकडे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३१ आॅगस्टपर्यंतची होती. विद्यापीठातील कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक व्यस्त राहिल्यामुळे त्यांना मुदतीमध्ये ‘कॅस’अंतर्गत प्रस्ताव दाखल करणे शक्य झाले नव्हते. प्राध्यापकांच्या मागणीनुसार कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी आॅगस्टऐवजी आता नोव्हेंबरअखेरपर्यंत असे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ जाहीर केली आहे. यासंबंधीचे परिपत्रक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी नुकतेच ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राचे संचालक डॉ. अशोक मोहेकर व सर्व विभागप्रमुखांना पाठविले आहे. विद्यापीठामध्ये अध्यापन आणि संशोधनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रोफेसर आणि प्राध्यापक उच्चश्रेणी या क्रमाने पदोन्नती दिली जाते. त्यासाठी जे प्राध्यापक सलग ८ वर्षे कायमस्वरूपी अध्यापनाचे काम करतात त्यांनी ३०० अंकांचा शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक (अकॅडेमिक परफॉर्मन्स इंडेक्स) सादर करणे अनिवार्य असते. विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले शोधनिबंध, संशोधनात्मक कार्य, अध्यापनातील सातत्य व विशेषत्व आदींचा त्या निर्देशांकामध्ये समावेश असतो. ज्या शिक्षकाचा निर्देशांक सर्वोत्कृष्ट त्यास सेवांतर्गत पदोन्नती दिली जाते.
‘कॅस’च्या प्रस्तावासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत
By admin | Published: September 14, 2014 12:00 AM