पैठण - पैठण शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी दोन दिवसा नंतर आज पुन्हा जोरदार अवकाळी पावसाने फटका दिला. पैठण शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पावसास सुरवात झाली सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. उकाड्यामुळे हैराण झालेल्या पैठण शहरातील नागरिकांना या पावसामुळे एकीकडे दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे रब्बीच्या पिकांचे शेतात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला . शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
पैठण शहर व परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अखेर, सायंकाळी साडेपाच च्या सुमारास पावसाला सुरवात झाली. शहरात वारा, वीजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला तालुक्यातील जायकवाडी, पिंपळवाडी, कडेठान, पाचोड , वडवाळी, नांदर, दावरवाडी, टाकळी अंबड, विहामांडवा आदी परिसरात रिमझीम पाऊस बरसल्या नंतर थांबला. पावसाचे हलके आगमन झाल्याने परिसरातील शेतकरी जोरदार पावसाच्या भितीने धास्तावला होता.
पैठण परिसर व तालुक्यातील नांदर डेरा कोंदर दावरवाडी परिसरात बुधवारी झालेल्या पावसामुळे गहू, व उन्हाळी ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. वारा आणि गारांमुळे नांदर परिसरातील आंब्याचा मोहरदेखील गळून पडला. मेथी, पालक, टोमॅटो, झेंडूचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी तलाठी यांनी केली आहे ; परंतु प्रशासनाचे आदेश नसल्याने पंचनामे करण्यास असमर्थता तलाठ्यानी व्यक्त केली.
पिके अजून शेतात.....सध्या सर्वत्र रब्बी हंगामाची सोंगणी अंतिम टप्यात आलेली आहे. या परिस्थितीत ‘कोरोना’ च्या संकटाने मजुर सोंगणीला नेता येत नाहीत. मजुर देखील यायला तयार नाहीत, त्यात हार्वेस्टर यंत्रचालकही पिकाच्या काढणीला तयार होत नसल्याने शेतात अजुनही पिके उभे आहेत. त्यामुळे एक-दोन मजुरांच्या सहायाने शेतकऱ्याची सोंगणी सुरू आहे. मात्र, अवकाळी पाऊसाने या कामावरही गदा आणली आहे.दोन दिवसाच्या पावसाने
शेतकऱ्यांना मोठा फटका......बुधवारी झालेल्या गारपीट व पावसाने नांदर शिवारात फळबागा सह सोंगून ठेवलेली ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू पिकाचे नुकसान झाले. मोसंबी व संत्र्याचेही नुकसान झाले .परवाच्या पावसाने हाता तोंडाशी आलेले संत्र्याचे पीक वादळी वाऱ्यामुळे गळून पडले असून, काही संत्र्याची झाडे उन्मळून पडली असे नांदर येथील शेतकरी दिनकर सुखदेव सोनवने यांनी सांगितले. शेवग्याची शेती करणारे शेतकरी राजेंद्र गवारे यांची गट न.२१० मध्ये दिड हजार शेवग्याची झाडे होती. परंतु, या बेमोसमी पावसामुळे शेवग्याच्या बगीच्याचे मोठे नुकसान झाले असून १५००पैकी जवळपास सहाशे झाडे मोडून पडली. अर्जुन काळे, बाळासाहेब खुळे, भास्कर सोनवने आदी शेतकऱ्यांनी गहू व उन्हाळी बाजरीचे नुकसान झाल्याचे सांगितले