औरंगाबाद: नवीन शैक्षणिक धोरण याबाबत स्पष्टता येण्यासाठीसाठी कार्यशाळा होतेय. सध्याच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांवर दोन पानी धडा आहे. आता १००-२०० पानाचे पुस्तक नव्या अभ्यासक्रमात घेता येईल का? याचा विचार आम्ही करतोय, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. ते शहरातील वंदे मातरम् सभागृहाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते.
राज्यात येत्या वर्षांपासून नव्या शैक्षणिक धोरणाची विद्यापीठात अंमलबजावणी होणार आहे. यानुसार तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणारा आहे. तसेच अभ्यासक्रमातील अनेक बदल नव्या शैक्षणिक धोरणात आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन अभ्यासक्रमात काय असू शकते यावर भाष्य केले आहे.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली. काय झाले तर काय करायचे हे विचार मंथन करुन त्यांनी घटना लिहिली. त्यामुळे आतापर्यंत कधी घटनात्मक पेच निर्माण झाला नाही. त्या बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला, त्यांनी किती पुस्तके लिहिली, त्यांचे आंबेडकर नाव कसे झाले, हे तरुण पिढीला अभ्यासता यावे, अशा पद्धतीने नव्या अभ्यासक्रमात बदल केले जातील. तसेच वंदे मातरम् सभागृहाचे उद्घाटन करताना आजही वंदे मातरम् म्हणायला विरोध करणारे आहेत. त्या वंदे मातरम् , द्वैतअद्वैत आजच्या पिढीला शिकण्याची गरज आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.