छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही रस्ता किंवा चौक टाऊन प्लॅनिंगच्या नियमांच्या चौकटीत तयार केलेला नाही. ते निर्माण करताना नियोजनाचा अभाव असल्याचे मत व्यक्त करीत महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पालिका प्रशासनावरच बोट ठेवले.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौक आणि रस्ते याबाबतची सद्य:स्थिती पाहता नित्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसते आहे. त्या अनुषंगाने प्रशासकांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी शहर विकास आराखड्याच्या अनुषंगाने एका चर्चासत्राचे आयोजन स्मार्ट सिटी कार्यालयात केले होते. त्यात जी. श्रीकांत यांनी मत मांडताना शहरातील रस्ते व चौकांच्या सद्य:स्थितीवर बोट ठेवले. त्यांचा रोख आजवर पालिकेचा कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांकडे असावा अशी चर्चा आहे.
शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून पीएलयू (प्रास्तावित जमीन वापर नकाशा) कसा असावा, याबद्दल पालिका प्रशासन शहराच्या विकासात सहभागी असलेल्या संस्था, संघटनांशी चर्चा करीत आहे. यावेळी जी. श्रीकांत म्हणाले, शहरातील एक तरी चौक योग्य प्रकारे असल्याचे दाखवा. योग्य प्रकारे नियोजन न करता रस्ते आणि चौक तयार करण्यात आले आहेत. जुन्या शहराची स्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. रस्ते अरुंद झाले आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची साधने या रस्त्यावरून जाणे अवघड होत आहे. सार्वजनिक वाहुतक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर असून पन्नास टक्के टीडीआर संबंधितांना वापरणे बंधनकारक केले आहे.
स्वार्थासाठी शहर वेठीस धरले आहे....पाच ते दहा लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, त्यामुळे शहराचे नुकसान होत आहे. विकास आराखडा तयार करताना जागांवर आरक्षण पडणारच आहे, पण ते काम पारदर्शकतेने व्हावे. शहराची गरज लक्षात घेऊन पालिका काम करीत आहे. त्यामुळे विकास आराखड्यावर कमीत-कमी सूचना, हरकती येतील, असा प्रशासनाचा प्रयत्न असेल. वेळेत विकास आराखडा तयार करण्याचा होईल, अशी अपेक्षा प्रशासकांनी व्यक्त केली. नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरासाठी चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे, असा दावा जी. श्रीकांत यांनी केला.