लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी संघटना या पक्षांनी राज्य शासनाची कर्जमाफी ही फसवी आहे, असा अपप्रचार सुरु केला आहे. परंतु, देशातील सर्वात मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकºयांना दिली आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा तथा स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.शहरातील वसमतरोडवरील बी.रघुनाथ सभागृहात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात लोणीकर बोलत होते. यावेळी आ.मोहन फड, माजी आ.विजयराव गव्हाणे, प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विद्याताई पाटील, बाबासाहेब फले, आनंद भरोसे, शिवहरी खिस्ते, गणेशराव रोकडे, डी.एस. कदम, विठ्ठल रबदडे, बालाजी देसाई, तालुकाध्यक्ष राजेश देशमुख आदींची उपस्थिती होती. या मेळाव्यात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील आॅनलाईन अर्ज भरण्याच्या मोफत प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.या मेळाव्यात पुढे बोलताना लोणीकर म्हणाले, देशात व राज्यामध्ये भाजपाचे सरकार आहे. नागरिकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेचे अर्ज गावा-गावात जावून शेतकºयांकडून भरुन घ्या, जेणेकरुन या कर्जमाफीचे श्रेय तुम्हाला मिळेल. आघाडी सरकारने शेतकºयांसाठी कोणतीही ठोस योजना अंमलात आणली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येची वेळ येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकºयांना ७० वर्षाच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी संघटना या पक्षांना कर्जमाफीवर टीका करण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. या मेळाव्यास जिल्हाभरातून भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फसवी नव्हे; सर्वात मोठी कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:35 AM