उपमहापौरपद निवडणूकीबाबत महाआघाडीचे ठरेना; भाजप देणार उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:09 PM2019-12-26T12:09:16+5:302019-12-26T12:13:52+5:30
शिवसेना स्वत: निवडणूक लढविणार का? मित्रपक्षांना उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद : भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या रिक्त पदाची निवडणूक ३१ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. उद्या गुरुवारपासून उमेदवारी अर्जाचे वितरण होणार आहे. २७ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्याप काही ठरले नाही. शिवसेना स्वत: निवडणूक लढविणार का? मित्रपक्षांना उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचा निषेध म्हणून उपमहापौर विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपमहापौरपदासाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. २६ डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांचे वितरण केले जाईल तर २७ डिसेंबरला भरलेली नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू होत असताना उपमहापौरपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राज्यातील नव्या समीकरणानुसार उपमहापौरपद मिळावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे.
महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य असल्यामुळे शिवसेना ठरवील त्याच पक्षाचा उपमहापौर होणार आहे. मात्र शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. बहुमतासाठी ५६ नगरसेवकांची गरज आहे. मागील महापौर निवडणुकीत सेनेने ७७ मते मिळविली होती. महापालिकेत काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत. उपमहापौरपदाची उमेदवारी मिळावी म्हणून नगरसेवकांनी आतापासूनच नेत्यांकडे लॉबिंग सुरू केली आहे. अवघ्या दोन महिन्यांसाठी उपमहापौर होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे.
भाजप ‘नीती’कडे लक्ष
भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी यापूर्वी आम्ही उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार असे जाहीर केले आहे. भाजपसोबत गजानन बारवाल यांची अपक्ष आघाडीही आहे. या आघाडीचा उमेदवार देऊन एमआयएम पक्षाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्नही होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. भाजपसोबत जाणे एमआयएम पक्षाला परवडणारे नाही.
सेनेसोबत प्राथमिक चर्चा
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासोबत महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा झाली आहे. काँग्रेसला उपमहापौरपद मिळावे, अशी मागणी करण्यात आली असून, अद्याप काही कळविण्यात आलेले नाही. काँग्रेसला संधी मिळाली तर नाव पक्षाकडून निश्चित करण्यात येईल.
- नामदेव पवार, शहराध्यक्ष काँग्रेस