औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सखोलपणे चर्चा झाल्याचे स्पष्टीकरणच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. प्रकाश आंबेडकर सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना युतीबाबत स्पष्टपणे सांगितले. तसेच, आंबेडकर यांनी भाजपवर टीका करताना भाजपचा पुढील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, हे नावच जाहीर केले. तर, नाशिक पदवीधर मतदारसंघातील गोंधळाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांना हे मान्य नसले तरी करावं लागत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात. यातूनच सत्यजित तांबे प्रकरण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य नसले तरी हे घडत असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच, आता बाळासाहेब थोरात यांनादेखील काँग्रेसचा मुख्यमंत्री फेस व्हायचं आहे, असेही त्यांनी म्हटले. राज्यातल्या सर्व शिक्षक आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत मतदारांमध्ये रोष आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदान अधिक झाल्यास आम्हाला विजयाची संधी अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण १ नंबरचे खोटारडे
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये आल्यावर प्रकाश आंबेडकर यांना आम्ही खासदारकीसाठी मागच्यावेळी ऑफर दिल्याचे म्हटले होते. यासंदर्भात विचारणा केली असता, पृथ्वीराज चव्हाण एक नंबरचे खोटारडे आहेत. ते मुख्यमंत्री असताना मला मंत्री बनावे असं माणिकराव आणि चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडून त्यांना माझ्यासोबत युती कारायची होती. मात्र, त्यांना सोनिया व राहुल गांधींनी नकार दिला. त्यामुळे, हे सारे फिस्कटले, असा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी हे 2024 साठी नसून 2029 साठी तयारी करत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्त्व हे अवसरवादी हिंदुत्व आहे. उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारीक विचारसरणीचे आहेत. त्यामुळे, आमच्या युतीची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सागितले.