छत्रपती संभाजीनगर : कोण कशाची चोरी करेल, याचा नेमच नाही. शहागंज भागात चक्क चोरट्यांनी १६ किलो काजू, १० किलो बदामावर ताव मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अब्दुल सलाम (रा. लोटाकारंजा) यांचे शहागंज भागातील भाजीमंडईत ए.आर. ट्रेडर्स नावाचे सुक्यामेव्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे २९ मे रोजी रात्री १०:३० वाजता ते दुकान बंद करून घरून निघून गेले. ३० मे रोजी सकाळी १० वाजता दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना दुकानाच्या वरचे पत्रे उचकटलेले दिसले. चोरांनी दुकानातील ११ हजार २५० रुपये किमतीची १ किलो वजनाची काजूची १६ पाकिटे, ७ हजार २०० रुपये किमतीचे एक किलो वजनाची बदामाची १० पाकिटे चोरून नेल्याचे दिसले. एकूण १८ हजार ४५० रुपयांचे काजू, बदामावर चोरट्यांनी ताव मारल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे मोहम्मद अब्दुल सलाम यांनी सिटी चौक पोलिसांना घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी दुकानाची पाहणी केली. त्यानंतर दुकानदाराच्या तक्रारीवरून काजू, बदामावर ताव मारणाऱ्या चाेरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वीही चोरट्यांनी एका घटनेमध्ये डाळी, ज्वारीचे पीठ चोरून नेले होते. त्याशिवाय एका किराणा दुकानातून विविध प्रकारच्या वस्तूही चोरण्यात आल्या होत्या. सिटी चौक पोलिस तपास करीत आहेत.
चोरटे सीसीटीव्हीत कैदकाजू, बदामावर ताव मारणारे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. चाेरी करताना त्यांनी तोंंड कापडाने बांधल्याचे दिसले.