छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वेचे आताच तिकीट मिळत नाही. ६० दिवसांमुळे आणखी ‘वेटिंग’ वाढेल. यातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणखी वाढेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे शक्य होते. रेल्वेचे तिकीट आरक्षित करणेही सोयीचे होते. परंतु ६० दिवसआधी तिकीट बुकिंगच्या निर्णयामुळे रेल्वेंना प्रवाशांची झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे आगामी ६० दिवसांतीलच करावे लागेल. त्यामुळे घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
१२० दिवस कायम राहावेरेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवस कायम राहावे.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’
पर्यटनाचे नियोजन कोलमडेलअनेक जण नियोजन करून कुटुंबासह पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. परंतु रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यटनाचे नियोजन कोलमडेल. याचा पर्यटननगरीलाही फटका बसेल. रेल्वेंना वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम राहावा.-राज सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना
नियोजन करणे अशक्य६० दिवसांनंतर कुठे रेल्वेने जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हाॅटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास पुढे ढकलावा लागेल. त्यामुळे कोणताही बदल करता कामा नये.-अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
तारखेनुसार नियोजनज्या तारखेला जायचे असेल, त्यानुसार रेल्वेच्या तिकिटाचे बुकिंगचे नियोजन करावे लागले. प्रवासाची तारीख आणि बुकिंगची ६० दिवस आधीचा कालावधी, हे पाहून प्रवाशांना नियोजन करावे लागेल.-जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन