लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : १२५ कोटी लोकांच्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) सक्षम प्रणाली नाही. जीएसटी हे तांत्रिक मॉडेल आहे. त्यात तत्त्वज्ञान नाहीच. पुढील काळात या करप्रणालीमुळे गुंतागुंत आणखी वाढेल व राज्यांचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते, असा धोक्याचा इशारा अर्थक्रांतीचे अनिल बोकील यांनी शनिवारी येथे दिला.इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडिया (आयसीएआय)च्या अंतर्गत सीए विद्यार्थी संघटनेच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेला सकाळी सुरुवात झाली. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते करण्यातआले.उद्घाटनानंतर आयोजित सत्रात बोकील यांनी सांगितले की, जीएसटीमध्ये पेट्रोल-डिझेलचा समावेश करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, तेवढे शक्य नाही. कारण, सरकारच्या तिजोरीत जमा होणारी सर्वात मोठी रक्कम पेट्रोल-डिझेलच्या करातून येते.इंधन जीएसटीत आणले, तर संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळेल. कर्नाटक सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अखेर पेट्रोल-डिझेलवरील करात वाढ करावीच लागली. जीएसटी लागू झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेत मागील ३ ते ४ महिन्यांपासून पगार झाले नाहीत. यासाठी जीएसटीऐवजी देशाची स्वतंत्र करप्रणाली केंद्र सरकारला आणावी लागेल. देशात अर्थक्रांती घडविण्यासाठी सर्व प्रकारचे ‘कर’ रद्द करण्यात यावेत. फक्त बँकिंग व्यवहारावर ‘कर’ लावण्यात यावा. तोही बँकेतून पैसे काढण्यावर कर लावण्यात यावा. आज व्याजावर बँका चालतात. मात्र, व्यवहारावर कर लावला, तर बँकांकडे जास्त पैसा येईल व कमी व्याजदरावर कर्ज मिळेल. सरकारच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणात कर जमा होईल, असे ते म्हणाले.तत्पूर्वी, उद्घाटन सत्रात धानोरकर यांनी सीए विद्यार्थ्यांना नेहमी मोठी स्वप्ने पाहा व ती सत्यात उतरविण्यासाठी अथक परिश्रम घ्या, असा सल्ला दिला. ‘अर्जुन सर्वश्रेष्ठ शिष्य’ या संकल्पनेवर आधारित परिषदेचा उल्लेख करीत सीए उमेश शर्मा म्हणाले की, आजचे अर्जुन उद्याचे कृष्ण आहेत. अभ्यासात एकाग्रता निर्माण करण्यासाठी जीवनात नेहमी अर्जुनासारखे ध्येय बाळगले पाहिजे.‘जगात फक्त १.५ मिलियन सीए आहेत. यामुळे सीए ला संपूर्ण जगात मागणी आहे,’ असे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अनिल भंडारी यांनी सांगितले.दोनदिवसीय परिषदेतील तज्ज्ञांनी दिलेले ज्ञान पूर्ण क्षमतेने ग्रहण करा, असे आवाहन ‘विकासा’चेअरमन विक्रांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केले. स्थानिक शाखेचे अध्यक्ष पंकज सोनी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर आयसीएआयचे शाखाध्यक्ष सचिन लाठी, माजी अध्यक्ष अल्केश रावका, विकासा उपाध्यक्ष यश जैन, सचिव ममता विखोना यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलान आकाश बोरा व दिव्या दर्डा यांनी केले. योगेश अग्रवाल यांनी आभार मानले. मागील वर्षी उत्कृष्ट उपक्रम राबवीत दिल्ली जिंकणारे ‘विकासा’चे माजी अध्यक्ष सीए रोहन आचलिया व त्यांच्या सर्व पदाधिकाºयांचा यावेळी गौरव करण्यात आला.अर्थव्यवस्थेला हँकिंगचा धोकाआयटी सिक्युरिटीचे उपाध्यक्ष संगीत चोपरा यांनी सांगितले की, इंटरनेटच्या प्रसाराबरोबरच सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. तुमचा मोबाईल, फेसबुक, कॉम्प्युटरमधील सर्व डॉटा, आयडी, पासवर्ड, ओटीपी नंबर अवघ्या २० सेकंदांत हॅक होऊ शकतो, अशी स्पॉटवेअरर्स आली आहेत. इंटरनेट हँकिंगमुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. यासाठी सीए व विद्यार्थ्यांनी सदैव सावध राहावे. आपला मोबाईल व ओटीपी नंबर कोणालाही देऊ नये. मोबाईल दिला तर गेस्ट मोडवर ठेवावा, तसेच सुरक्षेसाठी अन्य उपायही त्यांनी यावेळी सांगितले.