- संतोष हिरेमठऔरंगाबाद : प्रसूती म्हटले की एकतर नैसर्गिक अथवा सिझेरियन प्रसूती, इतकेच सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर येते. मात्र, गेल्या तीन वर्षांत औरंगाबादेत ७१७ बाळांचा जन्म नैसर्गिक आणि सिझेरियन प्रसूतीने झालेला नसल्याचे स्वत: डाॅक्टर सांगतात. वैद्यकीय परिभाषेनुसार या सर्व बाळांचा जन्म ‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’च्या माध्यमातून झाला आहे. या प्रकारच्या प्रसूतीत विशिष्ट प्रकराचा चिमटा आणि वैद्यकीय उपकरणाचा उपयोग केला जात असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात ‘रँचो’ने केलेली प्रसूती आठवते का तुम्हाला? अगदी तशीच काहीशी प्रसूती ‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’मध्ये केली जाते.
औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) या ७१७ ‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’ झालेल्या आहेत. सामान्यत: आपली नैसर्गिक प्रसूती व्हावी, अशी इच्छा प्रत्येक गरोदर मातेची असते. कारण नैसर्गिक प्रसूती होणे, म्हणजे कोणताही धोका नसणे आणि प्रसूतीनंतर काही दिवसांत महिला आपले दैनंदिन जीवन जगू शकते. मात्र, आई किंवा बाळाला धोका असल्यास सिझेरियन प्रसूती केली जाते. यात ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढले जाते. परंतु, सिझेरियन प्रसूतीपूर्वी ‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’चा पर्यायदेखील डाॅक्टरांकडून स्वीकारला जातो.
कोणत्या साहित्यांचा वापर?‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’मध्ये एका विशिष्ट प्रकारचा चिमटा आणि ‘व्हॅक्यूम कप’ वापरला जातो. गर्भपिशवीचे तोंड उघडलेले नसेल, तर अशी प्रसूती करता येत नाही, असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले.
‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’ कधी?प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर गर्भपिशवीचे तोंड पूर्ण उघडते. बाळाचे डोके खाली सरकते, परंतु नंतर डोके बाहेर येणे थांबते. अशावेळी सिझेरियन प्रसूती करणे अशक्य होते. शिवाय नैसर्गिक प्रसूतीसाठी वाटही पाहता येत नाही. अशा परिस्थितीसह आईला हृदयविकार असेल, मुदतपूर्व प्रसूती होत असेल, नैसर्गिक प्रसूतीदरम्यान जेव्हा आई थकते, कळा देऊ शकत नाही, अशावेळी ‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’चा पर्याय स्वीकारला जातो.
सिझेरियनपेक्षा कमी जोखीम‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’ ही तज्ज्ञ डाॅक्टरांकडून केली जाते. अशाप्रकारची प्रसूती करण्याची वेळ अनेक कारणांमुळे येते. ही प्रसूती सिझेरियनपेक्षा कमी जोखमीची. मात्र, नैसर्गिक प्रसूतीपेक्षा काहीशी जास्त जोखमीची असते.- डाॅ. सोनाली देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग विभाग, घाटी
कोणत्या वर्षी किती ‘इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी’वर्ष - संख्या२०२० - ३२५२०२१ - २४०२०२२ - १५२ (नोव्हेंबरपर्यंत)