छत्रपती संभाजीनगर :भविष्य निर्वाह निधी विभागाकडे २० हजार २१५ कंपन्या, आस्थापना नोंदणीकृत आहे. यातील फक्त १३६ कंपन्या,आस्थापनाने त्यांच्याकडे ५२२ कंत्राटदाराची माहिती पीएफच्या संकेतस्थळावर अपलोड केली. बाकीच्यांनी माहिती दडवून ठेवली आहे. एवढेच नव्हे तर सरकारी विभागांनीही त्यांच्याकडील कंत्राटदाराची माहिती न कळविल्याने. त्या कंत्राटदारांकडे किती कंत्राटी कामगार आहेत हे आकडेवारी समोर आली नाही. त्या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरल्या जात नसल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे, माहिती पाठविण्यास निष्काळजी करणाऱ्या कंपन्या, आस्थापनाविरोधात कारवाईला सुरुवात झाली असून, नोटीस बजावल्या आहेत. कारवाई टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदाराची माहिती पीएफ विभागाला लवकर पाठवा, असा इशारा देण्यात आला आहे.
भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लातूर व धाराशिव वगळता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह अन्य जिल्ह्यांचा समावेश होतो. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील कंत्राटदार, साखर कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था, हॉटेल, शैक्षणिक संस्था, कंपन्या, रुग्णालये, उद्योग असे विभागात (एम्पलॉयर अथवा इस्टाब्लिशमेंट) नोंदणीकृत आस्थापनांची संख्या २० हजार २१५ आहे. यातील १३६ कंपन्यांनीच माहिती विभागाला कळविली आहे. ज्यांनी माहिती सादर केली नाही. त्यांना ई-मेलद्वारे नोटिसा दिल्या आहेत. याशिवाय नोंदणीकृत मुख्य नियोक्ते, कंत्राटदार यांना फोन, ई-मेलद्वारे तसेच वेबिनार घेत याबाबत या आधीच सूचना दिल्या असल्याची माहिती पीएफ विभागाचे विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली.
मनपा, घाटीसह काही सरकारी विभागांचा कानाडोळासरकारचे विविध कार्यालय पीएफ कार्यालयाच्या कार्य क्षेत्रात येत नाही. पण अनेक कार्यालयात कंत्राटदारांमार्फत कामे केली जातात. त्या कंत्राटदारांकडील कामगारांना नियमाप्रमाणे पीएफचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कंत्राटदारांची माहिती संबंधित सरकारी विभागाने देणे बंधनकारक आहे, पण रेल्वे व पीएफ विभागानेच पीएफ विभागाच्या संकेतस्थळावर कंत्राटदाराची माहिती अपलोड केली आहे. मनपा, घाटीसह काही सरकारी विभागाने माहिती पाठविलीच नाही.