छत्रपती संभाजीनगर : मिसारवाडीतील बहुतांश रस्ते सिमेंटीकरणामुळे चकाचक झाले;परंतु आरतीनगर, कादरिया कॉलनीसह परिसरात पावसाळ्यातच नव्हे, तर १२ महिने ड्रेनेज चोकअपने दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. महावितरण अधिकाऱ्यांना अडचणी सांगण्यास जाणाऱ्या नागरिकावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. वीज मीटर असूनही तक्रार करायची नाही, तर अंधारात राहायचे काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वीजबिल दाखव तरच तक्रार कर, असा दंडक लावलेला आहे. महानगरपालिकेचे कचरा जमा करणारे वाहन नियमित येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
रस्ता झाला उंच, घरे गेली खालीड्रेनेज व पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाइप टाकल्यामुळे त्रास कमी होण्यापेक्षा उलटा वाढलेला आहे. रस्त्याची उंची वाढलेली आहे. बहुतांश घरांचे उंबरे रस्त्याच्या खाली आहेत. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. गटारी तुंबल्या असून, पाणी निचरा होण्याऐवजी नागरिकांच्या घरात शिरत आहे.- मुनीर पटेल, रहिवासी
टँकरमुक्ती केव्हा?टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आरतीनगर, कादरिया कॉलनी परिसरातील नागरिक टँकरच्या पाण्यासाठी मनपाकडे वारंवार चकरा मारतात. महिनाभराचे पैसे भरूनही केवळ १५ दिवस टँकर पाणीपुरवठा करण्यात येतो.- हसीना शहा, रहिवासी
साथीचे रोग पसरण्याची भीती..मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन साफसफाई करावी, अन्यथा परिसरावर साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.- अंजनाबाई ससाने, रहिवासी
उघड्या डीपीचा धोकातुटलेल्या तारा अनेकदा पडून राहतात. त्यामुळे विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. डीपीला संरक्षक कुंपण लावावे.- शांतीलाल काळे, रहिवासी