औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांनी पदोन्नती करण्याची नव्हे, तर चक्क आम्हाला पदावनत करा, यासाठी प्रशासनाला साकडे घातले आहे, हे वाचून कदाचित सर्वांनाच नवल वाटेल; पण ते खरे आहे.
पदोन्नती मिळावी म्हणून सर्वच कर्मचारी- अधिकारी आणि शिक्षकही आग्रही असतात. यासाठी अनेकदा आंदोलने केली जातात, न्यायालयात याचिकाही दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आनंदाने मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची पदोन्नती घेतली. मात्र, यापैकी अनेक शिक्षक हे ऑनलाईन कामाबाबत अनभिज्ञ आहेत. अनेकांना सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे होणारा सततचा वाद, ताणतणाव, दैनंदिन पत्रव्यवहासाठी करावा लागणारा प्रवास, शालेय पोषण आहार योजना राबवताना येणाऱ्या अडचणी आदींमुळे अनेक मुख्याध्यापक त्रस्त आहेत. काही अपंग महिला मुख्याध्यापकांची तर अनेकदा आर्थिक लुबाडणूक होत आहे. त्यामुळे महिला मुख्याध्यापक मानसिक दडपणाखाली आहेत.
दुसरीकडे, काही शिक्षकांना पदवीधर शिक्षकपदावर पदोन्नती मिळाली खरी; परंतु त्यांची अवस्था आता ‘भीक नको, पण कुत्रे आवार’ अशी झाली आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचे वाढते प्रस्थ, नवनवीन संगणक प्रणाली अवगत करून कामे करताना होणारी दमछाक आदींमुळे अनेक त्रस्त पदोन्नत शिक्षकांनी पदावनत करा म्हणून जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे.
अशा शिक्षकांकडून पदावनत करण्याबद्दल शपथपत्र घेऊन संबंधितांच्या जागा तात्पुरत्या रिक्त दाखवाव्यात आणि त्या ठिकाणी आगामी काळात पदोन्नती दिलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी. तत्पूर्वी, शपथपत्र देणाऱ्या शिक्षकांना लगेच समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. या प्रक्रियेत शासनावर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही. उलट नव्याने राबविण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीमुळे बोजा कमी होणार आहे. याशिवाय नव्या दमाचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक मिळतील, असे शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने सुचविले आहे.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांची भेट घेऊन जि. प. स्थायी समिती सदस्य मधुकरराव वालतुरे, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे. के. चव्हाण, बळीराम भुमरे, संजय भुमे, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे, अंकुश जाधव, नारायण साळुंके, संजय भडके, ईश्वर पवार, अशोक डोळस, भास्कर चौधरी, राहुल पवार, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश सरोते, विनोद जाधव आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.