औरंगाबाद: टीईटी घोटाळ्यात मुलांची नावे आल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांनी खुलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची ईडी चौकशी करत असून खरा प्रकार पुढे येईल. मात्र, यामुळे बदनामी होत आहे. या षडयंत्राच्या मुळाशी कोण आहे याकडे आधी माझे लक्ष असेल त्यानंतर मंत्रिपदाचे बघू. खोटीयादी प्रकाशित करून बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा सत्तारांनी दिला.
शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे टीईटी घोटाळ्यातील अपात्रतेच्या यादीत आल्याने खळबळ उडाली आहे. माझ्या मुलांची नावे यादीत आल्याचे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यामुळे मीच यावर खुलासा दिला आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे. टीईटीची ती यादी फेक आहे. माझा किंवा माझ्या कुटुंबाचा याच्याशी काही संबंध नाही. जे यात दोषी असतील त्यांना फासावर लटकवा, असे सत्तार म्हणाले आहेत. माझ्या मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांची नावे यात कशी आली, यामागे मोठे षड्यंत्र आहे. मुलाने तर कधी ही परीक्षाच दिली नाही, तरीही त्याचे नाव यात आले आहे असा दावाही सत्तारांनी केला.
मात्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही यादी पुढे आली आहे का ? असा प्रश्न विचारला असता सत्तार यांनी मंत्रिपदाचे सोडा, आधी बदनामी करणाऱ्यांचे पाहतो. याविरोधात चौकशी करण्याची मागणी संबंधित शिक्षण सचिव यांना करणार आहे. आरोप करणाऱ्या अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्याचीच चौकशी समिती नेमा. उपलब्ध कागदपत्रे त्यांना द्यावी. या षडयंत्रामागचे सत्य बाहेर आले पाहिजे. नाहक बदनामी करणाऱ्यांवर कादेशीर कारवाई करणार असा इशारा देखील सत्तार यांनी यावेळी दिला आहे.